पनवेल | कथित मतचोरी आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून पनवेलमध्ये काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार पनवेल शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळील चौकात ‘व्होट बचाओ, देश बचाओ’ आंदोलन करण्यात आले.
‘व्होट चोर, गद्दी छोड’ आणि ‘ज्ञानेश कुमार हटाओ, देश बचाओ’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या कथित मतचोरीच्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसने सरकार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. पनवेल शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. अमित दवे यांनी केंद्र सरकारच्या घोषणांवर टीका केली. जनतेच्या मूलभूत प्रश्नांबरोबरच लोकशाहीचे रक्षण आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता हे मुद्देही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी कथित मतचोरीचा मुद्दा जनतेसमोर मांडल्यामुळे देशभरात या विषयावर चर्चा आणि जनजागृती होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महानगरपालिकेचे नगरसेवक लतीफ शेख यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मुद्द्यावर काँग्रेसच्या माध्यमातून जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. माजी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील असल्याचा विश्वास व्यक्त केला. हेमराज म्हात्रे यांनीही आंदोलनादरम्यान आपली भूमिका मांडली.
पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. श्रुती शाम म्हात्रे यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, ज्येष्ठ नेते, महिला पदाधिकारी आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी यशवंत सावळेकर, शशिकांत बांदोडकर, सुदाम पाटील, निर्मला मात्रे, हेमराज म्हात्रे, आदित्य सावळेकर, सुधीर मोरे, शाहिद मुल्ला, विकास भारतीय, राजाभाऊ दवे, सागर पगारे, अमित जगनाडे, आरती ठाकूर, नीता शेनॉय, अलका ठाकूर, चैताली ठाकूर आणि सुनंदा घरत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.