महाड | मुंबई-गोवा महामार्गावरील महाड तालुक्यातील नांगलवाडी गावच्या हद्दीतील उड्डाणपुलावर दुचाकी आणि कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दानिश इकबाल पालटे (वय ३९, रा. नशेमन कॉलनी, कालकाईकोंड, दापोली, जि. रत्नागिरी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात घडला. दानिश पालटे हे यामाहा कंपनीच्या दुचाकीवरून पोलादपूरच्या दिशेकडून महाडकडे जात होते. यावेळी त्यांनी गोव्याच्या दिशेने जाणार्या मार्गिकेवरून विरुद्ध दिशेने दुचाकी चालविल्याने मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणार्या स्कोडा कारला समोरून जोरदार धडक बसली.
या अपघातात पालटे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कारमधील प्रवासी अमीर अहमद कबीर अहमद काझीमी (वय ५२, रा. वाळीव, वसई, जि. पालघर) यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.