खारपाडा टोलनाक्यावर तुंबळ हाणामारी ! कर्मचारी अन् प्रवाशांमध्ये टोल भरण्यावरुन वाद विकोपाला

By Raigad Times    27-Oct-2026
Total Views |
 panvel
 
पनवेल | मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोलनाक्यावर रविवारी (२५ ऑक्टोबर) रात्री बसमधील प्रवासी आणि टोल कर्मचार्‍यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. टोल भरण्यावरून सुरु झालेल्या वादाचे काही वेळातच हिंसक संघर्षात रुपांतर झाले.
 
यावेळी लाठ्या- काठ्यांचा वापर झाल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेमुळे महामार्गावरील महत्त्वाच्या टोलनाक्यावरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोकणातून मुंबईच्या दिशेने जाणारी बस रविवारी रात्री खारपाडा टोलनाक्यावर आली होती.
 
बसच्या टोल भरण्यावरुन प्रवासी आणि टोल कर्मचार्‍यांमध्ये वाद सुरु झाला. सुरुवातीला शाब्दीक चकमकीपुरता मर्यादित असलेला हा वाद काही वेळातच चिघळला. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून हाणामारी सुरु झाली. यासंघर्षात लाठ्या-काठ्यांचा वापर झाल्याचेही समोर आले आहे.
 
हाणामारीची माहिती परिसरात पसरताच टोलनाक्यावर नागरिकांची गर्दी जमली. अचानक निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या हाणामारीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
 
उपलब्ध माहितीनुसार, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. टोल भरण्यासारख्या कारणावरुन वादाचे रुपांतर थेट हाणामारीत झाल्याने सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.