भीमाशंकरच्या रक्षणासाठी मनसेचा पहारा ! छत्रपतींच्या राज्यात गुजराती-मारवाड्यांची लुडबुड नका

संदीप देशपांडे यांचा सरकारला इशारा

By Raigad Times    27-Oct-2026
Total Views |
 karjat
 
कर्जत | कर्जत तालुक्यातील सायडोंगर परिसरात टोरंट कंपनीसाठी सुरू असलेल्या जंगलतोडीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत रविवारी (२५ ऑक्टोबर) जंगलात जागरण मोहीम हाती घेतली आहे. झाडांची कत्तल रोखण्यासाठी मनसेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी जंगलात मुक्काम करत परिसरात पहारा दिला.
 
यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात गुजराती- मारवाड्यांनी लुडबुड करायची नाही,” असा इशारा दिला.सायडोंगर परिसरात टोरंट कंपनीच्या प्रकल्पासाठी झाडे तोडली जात असल्याचा आरोप होत आहे.
 
या जंगलतोडीविरोधातील आंदोलन राज्यभर चर्चेत असतानाही दररोज सुमारे ५०० झाडे तोडली जात असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर पक्षाचे पदाधिकारी रात्रीच कर्जतमध्ये दाखल झाले.
 
मनसेचे नेते तथा मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनसे रेल्वे युनियनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जंगलात मुक्काम केला. पेज नदीतील खडकावर कोजागरी पौर्णिमाही साजरी करण्यात आली. या मोहिमेत स्थानिक आदिवासी आणि शेतकर्‍यांनीही सहभाग घेतला. जंगलातील विविध भागांत फिरून पाहणी केली.
 
झाडांची तोड रोखण्यासाठी आणि संबंधितांना इशारा देण्यासाठी काही ठिकाणी शेकोट्या पेटवण्यात आल्या. हातात काठ्या घेऊन कार्यकर्ते जंगल परिसरात पहारा देत होते. यावेळी संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. "झाडे जगवायला १०० वर्षे लागली आहेत; मात्र तीच झाडे इलेक्ट्रिक करवतीने एका मिनिटात नेस्तनाबूत होत आहेत. झाडांच्या रूपाने जिवंत माणसे मारण्याचे पाप हे सरकार करीत आहे. स्थानिक शेतकर्‍यांवरही जबरदस्ती केली जात आहे. शासनाने परवानगी दिली आहे, असे सांगून झाडांवर करवत फिरवली जात असेल, तर आम्ही हे सहन करणार नाही,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.
लोकशाही आहे की हुकूमशाही?’
राज ठाकरे या ठिकाणी येणार असल्याचे सांगत देशपांडे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राला आधार वाटणारे राज ठाकरे या ठिकाणी येणार आहेतच; पण राज्यातील सरकार हुकूमशाहीसारखे चालवले जात आहे.
 
हा देश लोकशाहीत आहे की हुकूमशाहीत, असा प्रश्न पडतो. यांच्यापेक्षा ब्रिटिश बरे, असे म्हणण्याची वेळ आली आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली. "हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जिल्हा आहे. येथे काय करायचे, हे कोणी गुजराती-मारवाडी ठरवू शकत नाही,” असा इशाराही देशपांडे यांनी दिला.