टोरंट प्रकल्प नको असेल, तर ठाण मांडून बसू - आदित्य ठाकरे

सर्वांना एकजुटीने लढण्याचे आवाहन

By Raigad Times    27-Oct-2026
Total Views |
karjat
 
कर्जत | तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल परिसरात टोरंट वीज प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जंगलतोडीविरोधात राजकीय वातावरण तापू लागले आहे. ठाकरे शिवसेनेचे नेते, आ.आदित्य ठाकरे यांनी सोमवारी (२६ ऑक्टोबर) भीमाशंकर अभयारण्य परिसरातील जंगलतोडीची पाहणी करत, स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, महिला आणि आदिवासीबांधवांशी संवाद साधला.
 
"तुम्हाला तुमच्या जमिनी वाचवायच्या असतील व प्रकल्प नको असेल, तर आम्ही तुमच्यासाठी येथे ठाण मांडून बसण्यास तयार आहोत,” असे आश्वासन देत त्यांनी ग्रामस्थांना एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले. टोरंट वीज प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याचा मुद्दा राज्यभर चर्चेत आहे. या वृक्षतोडीविरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत जंगलतोड रोखण्याचा प्रयत्न केला होता.
 
याची माहिती मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांसह पाली गावातील जंगल परिसराला भेट दिली. त्यांच्यासोबत खा.संजय राऊत, शिवसेना सचिव आ.अनिल परब, उपनेत्या सुषमा अंधारे, उपनेते बबन पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. जंगलतोडीची पाहणी केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
 
ते म्हणाले, "भकास करून कधी विकास होत नाही. मुख्यमंत्र्यांचा आवडता शब्द ‘पारदर्शक’ आहे. त्याप्रमाणे सर्व पारदर्शकपणे करा. जनसुनावणीत किती लोकांचे म्हणणे तुम्ही ऐकले? हा प्रकल्प करण्यासाठी किती पर्याय होते? ही जागा निवडल्यानंतर एका कंपनीसाठी इतका फौजफाटा कशाला लागतो? मेगावॉट, मेगावॉट करता; पण मेगा वाट तुम्ही लावत आहात.
 
’प्रकल्पाला विरोध करणार्‍या स्थानिकांना धमकावले जाण्याची किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याचे सांगत त्यांनी ग्रामस्थांना सावध केले. "तुम्हाला दमदाटी करतील, खोट्या केसेस करतील. जसे आमदार, खासदारांना विकत घेतात, तसे तुम्हाला विकत घेतले जाईल. पैसा टिकत नाही. पैसा जाईल-येईल; पण गेलेले नाव परत येणार नाही,” असे ते म्हणाले. या परिसराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पार्श्वभूमी असल्याचे नमूद करत आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र, रायगड जिल्हा आणि जंगलांचे संरक्षण करण्याची गरज व्यक्त केली.
 
"हा परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा आहे. रायगड जिल्हा वाचवायचा आहे. जंगले वाचवायची आहेत. कारण जमिनी गेल्या तर पुन्हा मिळणार नाहीत,” असे त्यांनी सांगितले. राजस्थानमधील चिपको आंदोलनाचा संदर्भ देत त्यांनी जंगल वाचवण्यासाठी लोकसहभागातून आंदोलन उभारण्याचे आवाहन केले. "झाडे तोडायला येणार्‍यांचे कटर पाण्यात फेका. ते गुजरातपर्यंत गेले तरी चालतील.
 
हा प्रकल्प रद्द करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र या. अगदी भाजपवाल्यांनीसुद्धा यावे,” असे आवाहन त्यांनी केले. स्थानिक ग्रामस्थांनी धरण आणि प्रकल्पाला विरोध असल्याची ठाम भूमिका घेतल्यास शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले. "तुम्हाला टोरंट नको असेल, तर आम्ही तुमच्यासाठी ठाण मांडून बसू. राजस्थानसारखे चिपको आंदोलन आपल्याला करावे लागेल. तुम्ही एकजुटीने पुढे आलात, तर मी स्वतः येथे येऊन बसेन आणि चिपको आंदोलनात सहभागी होईन,” असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा
खासदार संजय राऊत यांनीही या प्रकल्पावरून भाजप आणि केंद्रातील नेतृत्वावर टीका केली. "हा जय शाह यांचा पैसा असून, त्यांच्यासाठी दिल्लीतील दोन गुजराती महाराष्ट्राचा ओरबाडा काढायला आले आहेत,” असा आरोप त्यांनी केला. धरणासाठी चुकीच्या मार्गाने परवानग्या मिळवण्यात आल्याचा दावा करत शिवसेनेने राज्यातील असे दोन धरण प्रकल्प रोखून धरल्याची माहितीही त्यांनी दिली.
 
ग्रामस्थांनी एकजूट कायम ठेवल्यास पोलिसांची भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे सांगत त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. या पाहणीवेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, महिला जिल्हा संघटक सुवर्णा जोशी, उपसभापती चित्रा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे व बाबू घारे, माजी सभापती प्रदीप ठाकरे, सुजाता मनवे, उपनगराध्यक्ष संतोष पाटील, तालुकाप्रमुख बाजीराव दळवी, मोहन ओसवाल, रामदास घरत यांच्यासह अनेक पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
 
टोरंट प्रकल्पासाठी होणार्‍या वृक्षतोडीचा मुद्दा आता पर्यावरणीय प्रश्नासोबतच राजकीय संघर्षाचाही विषय बनला आहे. स्थानिकांच्या जमिनी, जंगल आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन करत आदित्य ठाकरे यांनी आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकल्पाविरोधातील आंदोलनाची दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.