श्रीवर्धन स्मशानभूमीत जादूटोणा; ५ जणांना रंगेहात पकडले , टाचण्या लावलेल्या फोटोंसह विविध वस्तू जप्त

By Raigad Times    27-Oct-2026
Total Views |
shreewardhan
 
श्रीवर्धन | श्रीवर्धन शहरातील दांडा परिसरातील समुद्रकिनार्‍यालगत असलेल्या स्मशानभूमीत कथित जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी अघोरी कृत्य करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तीन पुरुष आणि दोन महिलांना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
 
पोलिसांनी घटनास्थळावरून नारळ, लिंबू, काळ्या बाहुल्या, टाचण्यांनी लावलेले फोटो आणि दारूची रिकामी बाटली यांसह विविध वस्तू जप्त केल्या आहेत. या प्रकारात वापरण्यात आलेली इनोव्हा कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दांडा येथील स्मशानभूमीत मागील वर्षभरापासून वारंवार अशा प्रकारचे अघोरी कृत्य केले जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. अमावस्या, पौर्णिमा किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाचे दहन केलेल्या ठिकाणी नारळ, लिंबू, फोटो आणि अन्य वस्तू टाकल्या जात असल्याचे प्रकार यापूर्वीही घडले होते.
 
मात्र, हे कृत्य नेमके कोण करत होते, याचा उलगडा होत नव्हता. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी (२६ ऑक्टोबर) दुपारी पावणेबाराच्या सुमारास काही व्यक्ती स्मशानभूमीत संशयास्पद कृत्य करत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित पाच जणांना ताब्यात घेतले.
 
घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना नारळाला लाल व पांढरे धागे गुंडाळलेले, काळ्या बाहुल्या, लिंबू, टाचण्यांनी लावलेले फोटो आणि दारूची रिकामी बाटली आढळली. स्मशानभूमीतील दहनस्थळासह आजूबाजूच्या परिसरात या वस्तू टाकण्यात आल्या होत्या. प्राथमिक माहितीनुसार, ताब्यात घेतलेले संशयित पुणे परिसरातील असल्याचे समजते. त्यापैकी मुख्य संशयित एका स्वामी समर्थ मठात पुजारी म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
 
एका महिलेला तिच्या सासरी नांदवून घेतले जात नसल्याने तिला पुन्हा पतीकडे नांदायला पाठवण्यासाठी हा प्रकार केल्याची माहितीही समोर येत आहे. मात्र, या माहितीची अधिकृत पुष्टी आणि संपूर्ण प्रकारामागील नेमके कारण पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
 
तीन पुरुष आणि दोन महिला अशा पाच जणांची चौकशी सुरू असून, या कृत्यात आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.