उरण | जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणाला रस्त्यात अडवून लोखंडी हत्याराने डोक्यावर वार केल्यानंतर त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उरण परिसरात घडली आहे. या गंभीर प्रकरणात उरण पोलिसांनी तपासाची चक्रेवेगाने फिरवत दोघांना अवघ्या २४ तासांत अटक केली.
अष्टांग ऊर्फ सर्वेश हरेश्वर पाटील आणि ऋतिक पांडुरंग चाळके अशी दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा फिर्यादीसोबत पूर्वीपासून वाद होता. याच वादातून हल्ला केल्याचा आरोप आहे. फिर्यादी कामावरून मोटारसायकलवरून घरी जात असताना आरोपी बुलेटमोटारसायकलवरून त्यांच्या मागावर आले. त्यांनी फिर्यादीला रस्त्यात अडवून खाली उतरवले आणि पकडून ठेवत लोखंडी हत्याराने डोक्यावर पाच ते सात वार केले.
यानंतर फिर्यादीला जमिनीवरपाडून सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल अंगावर ओतून आग लावल्याचा गंभीर आरोप आरोपींवर आहे. जुन्या वादातून घडलेल्या याजीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी २२ ऑक्टोबर रोजी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोद शेवाळे आणि पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या.
वरिष्ठांच्या सूचनेनुसार उरण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. या तपासातून अष्टांग ऊर्फ सर्वेश हरेश्वर पाटील (वय २८, रा. उरण, जि. रायगड) आणि ऋतिक पांडुरंग चाळके (वय २६, रा. शिवणे गाव, नेरूळ, नवी मुंबई) या दोघांना नवी मुंबई परिसरातून अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना २७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर, पोलीस निरीक्षक राहुल काटवानी (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक गोविंद केंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील, वैभव रोंगे, पोलीस उपनिरीक्षक रोशन काथारा तसेच पोलीस अंमलदार जयंत घरत, शशिकांत घरत, किशोर फंड, अनिल मानकर, गंगाराम कचरे, रियाज शेख आणि बसवराज सकपाळ यांनी केली.