महाड | बिरवाडी बाजारपेठेशी आपले जुने आणि जिव्हाळ्याचे नाते असून, येथे होणार्या आपल्या कार्यक्रमामुळे काहींच्या पोटात दुखत असेल, तर त्यांना योग्य वेळी ओवा देऊ, अशा बोचर्या शब्दांत रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी राजकीय विरोधकांना लक्ष्य केले.
एका सामान्य शेतकर्याच्या मुलाला जनतेच्या आशीर्वादाने चार वेळा आमदार होण्याची संधी मिळाली असून, आपली नियत आणि नीतिमत्ता चांगली असेपर्यंत आपल्याला कोणीही पराभूत करू शकत नाही, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दशानेमा गुजराती समाजाच्या राधाकृष्ण मंदिराच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण आले.
बिरवाडी येथे दशानेमा गुजराती समाजाच्या राधाकृष्ण मंदिराचा २५ वा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला पालकमंत्री भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थिती होती. यानिमित्ताने बिरवाडी बाजारपेठेतून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी राजकीय विरोधकांवर निशाणा साधत आपल्या राजकीय प्रवासाचा आणि स्थानिकांशी असलेल्या संबंधांचा उल्लेख केला. राजकीय टीकाकारांना प्रत्युत्तर देताना भरतशेठ गोगावले म्हणाले, "बिरवाडी बाजारपेठेशी माझे वेगळे आणि जिव्हाळ्याचे नाते आहे. माझी ही आमदारकीची चौथी टर्म असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीपासून तुम्ही मला सहकार्य केले आहे. तुमचे हे सहकार्य मी कधीही विसरणार नाही.
मात्र, आज बिरवाडीत भरतशेठचा कार्यक्रम होत असल्याने काहींच्या पोटात दुखत आहे. त्याची काळजी करू नका; योग्य वेळी त्यांना ओवा देऊ.” पुढे ते म्हणाले, "भरतशेठने आजपर्यंत कोणाचे वाईट केले नाही आणि यापुढेही करणार नाही. ज्यांच्यावर संकट आले, त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम आम्ही केले आहे. कोणत्याही व्यापार्याने पुढे येऊन सांगावे की आम्ही त्याला कधी अडचणीत आणले आहे का? आम्ही कोणाला त्रास देत नसताना विरोधकांच्या पोटात दुखण्याचे कारण काय?” असा सवाल करत त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.