अलिबाग | चिंचोटीत जीर्ण वीजखांब घरावर कोसळला

By Raigad Times    25-Oct-2026
Total Views |
rewdanda
 
रेवदंडा | अलिबाग तालुक्यातील चिंचोटी येथे शनिवारी, २४ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास महावितरणचा जीर्ण झालेला विजेचा खांब अचानक प्रभाकर धर्मा भांजी यांच्या कौलारू घरावर कोसळला. या दुर्घटनेत घराच्या छताचे व कौलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
 
मात्र, सुदैवाने घरातील कोणालाही दुखापत झाली नसल्याने मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व पंचमंडळी घटनास्थळी जमा झाले. भाजपचे अलिबाग तालुकाध्यक्ष अशोकजी वारगे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
 
त्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता तायडे यांच्याशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती दिली. त्यानंतर महावितरणचे उसर येथील कनिष्ठ अभियंता निखिलेश शेंडे यांना घटनास्थळी पाठविण्यात आले. यावेळी चिंचोटी विभागाच्या तलाठी दीक्षा कडू तसेच चिंचोटी ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक उपस्थित होते. संबंधित अधिकार्‍यांनी नुकसानग्रस्त घराची पाहणी करून पंचनामा केला. या दुर्घटनेमुळे गावातील वीजखांबांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महावितरणने संपूर्ण गावातील वीजखांबांची तातडीने पाहणी करून धोकादायक खांब बदलावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.