कळंबोली | रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यादव नगर परिसरात जुन्या वादातून एका २५ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिवाकर सोमनाथ यादव असे मृत तरुणाचे नाव असून, पैशांच्या देवाणघेवाणीवरून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर गुरुवारी रात्री रक्तरंजित संघर्षात झाले.
या प्रकरणाचा छडा लावत रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत तीन आरोपींना ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार, दिवाकर यादव आणि योगेश जयस्वाल यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून जुना वाद सुरू होता. याच वादातून गुरुवारी रात्री दोन्ही गट आमनेसामने आले.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी दिवाकर यादव याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या तीन तासांत योगेश जयस्वाल ऊर्फ बॉबी, कृष्णा सिंह आणि विवेक यादव ऊर्फ छोटू या तिघांना ताब्यात घेतले.
मुख्य आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात योगेश जयस्वाल आणि कृष्णा सिंह यांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, विवेक यादव हा जखमी असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारानंतर त्यालाही अटक केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास कठाळे यांनी दिली. मित्राच्या नात्याला काळिमा फासणार्या या घटनेमुळे यादव नगर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्या वादातून घडलेल्या या हत्येप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.