श्रीवर्धन । श्रीवर्धन शहरात अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालविण्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. अनेक विद्यार्थी वयाची अट पूर्ण होण्यापूर्वीच पालकांच्या दुचाकी घेऊन शाळेत येत असल्याचे चित्र दिसत आहे. अशा वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, तसेच अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देणार्या पालकांनाही जबाबदार धरावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी जिल्हा वाहतूक शाखेकडून केवळ एकच वाहतूक पोलीस तैनात असल्याने सर्व भागांतील वाहतुकीवर नियंत्रण ठेवताना अडचणी येत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वार किंवा शिवाजी चौक परिसरातच वाहतूक पोलीस दिसतात; मात्र शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि नियमभंगाकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
विशेषतः जीवना बंदर परिसरातून शहरातील शाळांमध्ये येणार्या विद्यार्थ्यांपैकी काही जण दुचाकींचा वापर करतात. त्यांच्याकडे वैध वाहनचालक परवाना नसतानाही वाहने चालविली जात असल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. शाळा प्रशासनानेही विद्यार्थ्यांच्या या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देऊन पालकांशी संवाद साधावा, असे नागरिकांचे म्हणणे आहे. ओजाळे पाखाडी, महेश्वर आळीत गतिरोधकांची गरज शहरातील ओजाळे पाखाडी आणि महेश्वर आळी येथील रस्त्यांचे मे महिन्यात नूतनीकरण करण्यात आले.
या रस्त्यांमुळे जीवना परिसरात जाणार्या नागरिकांना जवळचा मार्ग उपलब्ध झाला आहे. मात्र, रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे काही वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवित असल्याची तक्रार आहे. रात्रीच्या वेळीही वेगाने वाहने धावत असल्याने अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांवर आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे.
सीसीटीव्ही यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न श्रीवर्धन शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असले, तरी काही कॅमेरे बंद असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. यंत्रणेवर खर्च केलेल्या निधीचा योग्य उपयोग व्हावा, यासाठी सर्व कॅमेरे नियमित सुरू ठेवून त्यांची देखभाल करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण, वाहतूक कोंडी आणि नियमभंगाच्या समस्यांबाबत यापूर्वीही आवाज उठविण्यात आला आहे.
मात्र, या प्रश्नांवर ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी नागरिक व्यक्त करीत आहेत. पोलिसांनी अल्पवयीन वाहनचालकांविरोधात नियमित तपासणी मोहीम राबवावी, नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी आणि पालकांनाही त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी, अशी मागणी होत आहे. श्रीवर्धन शहरातील वाहतूक सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्यासाठी पोलीस प्रशासन व संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष घालावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.