पनवेल । गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवादरम्यान पनवेल शहरातील प्रमुख चौकांमध्ये फुले खरेदीसाठी होणारी गर्दी आणि त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पनवेल शहर वाहतूक शाखेने नियोजनबद्ध उपाययोजना केल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज चौक, कर्नाळा सर्कल, उरण नाका परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांच्या सूचना, स्थानिक परिस्थितीचा आढावा आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाच्या आधारे हे नियोजन करण्यात आले आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपाययोजनांची आखणी करण्यात आली.
यासाठी पनवेल शहर पोलीस ठाणे, पनवेल महानगरपालिका, महापौर नितीन पाटील, नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकार यांच्याशी चर्चा करण्यात आली. संबंधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून वाहतुकीला अडथळा ठरणार्या बाबींचा आढावा घेण्यात आला. सणासुदीच्या काळात फुले खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. रस्त्यालगत फुलविक्रेत्यांचे व्यवसाय आणि वाहनांची अनियोजित पार्किंग यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो.
ही समस्या कमी करण्यासाठी भाऊराव पाटील चौक ते कर्नाळा भाजी मार्केट परिसरात फुलविक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, आवश्यक ठिकाणी एकेरी वाहतूक लागू करण्यात आली आहे. या नियोजनामुळे रस्त्यावरील अडथळे कमी करून वाहतुकीचा प्रवाह सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वाहतूक नियमांचे पालन करावे, निर्धारित पार्किंगच्या जागेचाच वापर करावा आणि रस्त्यावर वाहने उभी करून अथवा व्यवसायासाठी रस्ता अडवून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन पनवेल शहर वाहतूक शाखेने केले आहे.