माथेरानमध्ये बिबट्याच्या दोन पिल्लांचा मुक्त संचार ; वन ट्री हिल, अमन लॉज परिसरात वारंवार दर्शन

दिवसा बिबट्या दिसल्याने भीती

By Raigad Times    22-Oct-2026
Total Views |
 karjat
 
कर्जत । थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या दोन पिल्लांचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे. वन ट्री हिल आणि अमन लॉज परिसरात या पिल्लांचे वारंवार दर्शन होत असून, रात्रीसोबतच दिवसा बिबट्या दिसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
विशेषतः या परिसरातील शाळांमध्ये जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. माथेरानचा बहुतांश परिसर जंगलाने व्यापलेला असून, येथील वनसंपदा आणि नैसर्गिक अधिवासामुळे वन्यप्राण्यांचा वावर दिसून येतो. मात्र, मागील काही दिवसांपासून बिबट्याचे सातत्याने दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
 
अमन लॉज रेल्वे स्थानक परिसरातील टॅक्सी स्टँड, अमन लॉज बंगला आणि बेकरा रोड येथे प्रामुख्याने रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. वन ट्री हिल परिसरातही बिबट्याच्या पिल्लाचा वावर दिसून येत आहे. कॅसल रोड, कॉन्व्हेन्ट स्कूल आणि शारदा व्हिला परिसरात नागरिकांना त्याचे दर्शन झाले आहे. विशेष म्हणजे, नगरपरिषदेची रुग्णवाहिका या भागातून जात असताना दिवसा बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये अधिकच भीती पसरली आहे. या परिसरात दोन शाळा असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पालकांना चिंता
माथेरानमधील माजी मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे. शाळांच्या परिसरात दिवसा बिबट्याचे दर्शन होत असल्याने विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्यासाठी ई-रिक्षांची व्यवस्था कायम ठेवावी आणि त्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वन विभागाचे बिबट्याच्या हालचालींवर लक्ष
याबाबत वनक्षेत्रपाल आर.बी. गायकवाड यांनी सांगितले की, वन विभागाकडून बिबट्याच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. सध्या दिसणारे बिबटे ही साधारण एक वर्ष वयाची दोन पिल्ले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, अद्याप मादी बिबट्याचे दर्शन झालेले नसल्याने तिचाही शोध घेतला जात आहे. बिबट्याच्या पिल्लांचा वाढता वावर लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. विशेषतः शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने समन्वयाने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.