कोपरी तलावात बुडून दोन बालकांचा मृत्य ; देवी विसर्जनानंतर तलावातील पैसे काढण्यासाठी उतरले होते पाण्यात

By Raigad Times    22-Oct-2026
Total Views |
 new mumbai
 
नवी मुंबई । नवरात्रोत्सवानिमित्त देवी आणि घटांच्या विसर्जनावेळी तलावात वाहिलेले पैसे काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या दोन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वाशीतील कोपरी गाव तलावात घडली. गोलू मन्सूरी (10) आणि गणेश गुप्ता (12) अशी मृत बालकांची नावे आहेत.
 
या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, दोन बालकांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मंगळवारी (20 ऑक्टोबर) देवीच्या मूर्ती आणि घटांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी भाविकांकडून तलावात वाहिलेले पैसे काढण्यासाठी दोन्ही बालके तलावाच्या पाण्यात उतरल्याची माहिती आहे. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ती पाण्यात बुडाली असाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
या घटनेत दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोपरी गाव तलावातील या दुर्घटनेनंतर विसर्जनस्थळांवरील सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दोन बालकांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली ही वेदनादायी घटना भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित करते.