रोहा | रायगड जिल्ह्याचे श्रद्धास्थान आणि रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज यांच्या पालखी सोहळ्याला बुधवारी पहाटे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी रायगड पोलिसांच्यावतीने रोह्याचे पोलीस निरीक्षक अभय शेलार आणि त्यांच्या पथकाने श्री धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली.
हा सलामी सोहळा पाहण्यासाठी मंदिर परिसरात पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तीन वर्षांपूर्वी मंदिरासमोरील सभामंडप हटविण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी दोन्ही बाजूंना बैठक गॅलरी उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदा भाविकांना गॅलरीत बसून मानवंदना सोहळा पाहता आला.
यावेळी पालकमंत्री भरत गोगावले, मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष कुमार पाशिलकर, सरचिटणीस दर्शन कदम, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख,माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, विश्वस्त नितीन परब, विजय मोरे आदी उपस्थित होते. उत्सवानिमित्त मंदिराचा संपूर्ण परिसर विविध रंगांच्या फुलांनी सजविण्यात आला होता.
उंच कारंजे आणि आकर्षक रांगोळ्यांमुळे परिसराला प्रसन्न स्वरूप प्राप्त झाले होते. पहाटेच्या मंगलमय वातावरणात गोंधळ्यांच्या वाद्यांच्या गजरात ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली. त्यानंतर पोलिसांनी सशस्त्र मानवंदना दिली आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात महाराजांची पालखी मार्गस्थ झाली. शहरातील निर्धारित मार्गावरून मार्गक्रमण करत पालखी विविध ठिकाणी ग्रामस्थांना दर्शन देणार असून, दुसर्या दिवशी सकाळी मंदिरात परतणार आहे.
पालखी मंदिरात परतल्यानंतर पुन्हा महाराजांना पोलिसांकडून मानवंदना देण्यात येते. पालखीच्या स्वागतासाठी शहरातील विविध ठिकाणी रस्ते फुलांनी आणि आकर्षक रांगोळ्यांनी सजविण्यात आले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी करण्यात येणारी रोषणाई या सोहळ्याच्या भव्यतेत भर घालते. पालखी दर्शनासाठी रोह्यात येणार्या भाविकांच्या सेवेसाठी विविध सामाजिक संस्था आणि मंडळांनी पुढाकार घेतला आहे.
जैन संघटना, रोटरी क्लब आणि प्रकाश जैन यांच्यासह विविध मंडळांतर्फे शहरात ठिकठिकाणी थंडपेय, चहा आणि अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील आशीर्वाद मंडळातर्फेही गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली मोफत भोजनसेवा यंदाही सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यासाठी येणार्या भाविकांना दिलासा मिळत आहे.