महाड । आर्थिक अडचणींमुळे गोरगरीब आणि आदिवासी रुग्णांना उपचारांपासून वंचित रहावे लागू नये, यासाठी त्यांना मोफत उपचार मिळवून देण्यास प्राधान्य दिले जाईल. महाड- माणगाव-पोलादपूर मतदारसंघातील गरजू रुग्णांना मुंबई, पुणे आणि अन्य शहरांतील रुग्णालयांत उपचार मिळवून देण्यासाठी आरोग्य सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाआरोग्य मेळाव्यातून पुढील उपचारांची गरज असलेल्या रुग्णांनाही मदत केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिली. गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नांतून महाड येथील बुटाला सांस्कृतिक भवनात महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
कृष्णा विश्व विद्यापीठ, कराड आणि कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. मेळाव्यात अस्थिरोग, त्वचारोग, नेत्ररोग, दंतवैद्यक, स्त्रीरोग आणि कान-नाक-घसा यांसह विविध आजारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. रक्ततपासणी, फिजिओथेरपी आणि मोफत औषधवाटपाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.
तसेच आवश्यक शस्त्रक्रिया आणि आयुष्मान भारत व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार मिळविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांसाठी आशा रोटरी एक्सप्रेस व्हॅनद्वारे स्तनाचा आणि गर्भाशयमुखाचा कर्करोग ओळखण्यासाठी प्राथमिक तपासणीची सुविधा उपलब्ध होती. महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करून गंभीर आजारांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
या मेळाव्याला विविध शासकीय विभागांचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. एकाच ठिकाणी तपासणी, औषधोपचार आणि आरोग्य योजनांची माहिती मिळाल्याने गरजू रुग्णांना या उपक्रमाचा लाभ झाला. मेळाव्यात गंभीर आजारांचे निदान झालेल्या किंवा पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना योग्य रुग्णालयात उपचार मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
आर्थिक परिस्थितीमुळे उपचारांचा खर्च परवडत नसलेल्या रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मदत करणे, यावर भर देण्यात आला. महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंतनु डोईफोडे आणि पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भानुदास गिरी यांच्या आरोग्यसेवेतील योगदानाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.