सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर...जेएनपीए विश्वस्त निवडणुकीचा मार्ग मोकळा

14 डिसेंबरला मतदान; ऑफिसर्स असोसिएशनच्या सहभागामुळे लढत रंगणार

By Raigad Times    22-Oct-2026
Total Views |
 jnpt
 
उरण । जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या (जेएनपीए) दोन कामगार विश्वस्तपदांसाठी अखेर निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून, येत्या 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तब्बल सहा महिन्यांपासून रखडलेल्या या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने बंदर परिसरातील कामगार संघटनांमध्ये हालचालींना वेग आला आहे.
 
यंदा प्रथमच जेएनपीए ऑफिसर्स असोसिएशनलाही निवडणुकीत सहभागी होण्याची संधी मिळाल्याने पारंपरिक कामगार संघटनांसमोर आव्हान उभे राहिले आहे. जेएनपीए प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर ऑक्टोबर 2022 मध्ये पहिली कामगार विश्वस्त निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीतून निवडून आलेल्या दोन कामगार विश्वस्तांचा कार्यकाळ 31 मार्च 2026 रोजी संपुष्टात आला.
 
त्यानंतर निवडणूक होणे अपेक्षित असताना केंद्रीय कामगार आयुक्तांकडून आवश्यक मंजुरी न मिळाल्याने निवडणूक प्रक्रिया सुमारे सहा महिने रखडली होती. अखेर केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या सचिव अनिता बिस्त यांनी मुंबईच्या मुख्य कामगार आयुक्तांना 90 दिवसांत निवडणूक घेण्याचे निर्देश दिल्यानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, जेएनपीए ऑफिसर्स असोसिएशनने अधिकारीवर्गालाही विश्वस्त निवडणूक लढविण्याची संधी मिळावी, अशी मागणी केली होती.
 
यासंदर्भात मुंबईचे कामगार आयुक्त संजय डाबी यांनी बंदरातील कामगार संघटनांची बैठक घेतली होती. या बैठकीत अधिकारी हे कामगारवर्गाचा भाग नसल्याचे सांगत काही संघटनांनी ऑफिसर्स असोसिएशनच्या सहभागाला विरोध केला. मात्र, नवीन प्राधिकरण कायद्यात अधिकारी संघटनेलाही निवडणूक लढविण्याची तरतूद असल्याचे कामगार मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आल्याने या विषयाला वेगळे वळण मिळाले.
 
आता निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने दोन विश्वस्तपदांसाठी कोणत्या संघटना आणि उमेदवार मैदानात उतरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऑफिसर्स असोसिएशनच्या सहभागामुळे पारंपरिक कामगार संघटनांच्या रणनीतीत बदल होणार का, तसेच मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागणार, याबाबत बंदर परिसरात चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात मतदारांशी संपर्क, बैठका आणि संघटनात्मक ताकद दाखविण्याच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता असून, 14 डिसेंबरच्या मतदानातून दोन विश्वस्तपदांचा फैसला होणार आहे.