रायगडच्या कुशीत फुलपाखरांची रंगीबेरंगी दुनिया , जिल्ह्यात 147 प्रजातींचा मुक्त संचार

By Raigad Times    22-Oct-2026
Total Views |
 
bense
 बेणसे । “किती छान दिसते फुलपाखरू...” बालपणीची ही कविता आठवली की डोळ्यांसमोर अलगद फुलांवर बागडणार्‍या फुलपाखरांचे चित्र उभे राहते. निसर्गाच्या या छोट्याशा कलाकारांची दुनिया पाहताना मनही आनंदाने फुलून जाते. रायगड जिल्ह्यात सध्या अशाच रंगीबेरंगी फुलपाखरांची मुक्त उधळण पाहायला मिळत आहे.
 
पश्चिम घाटाचा विस्तीर्ण डोंगराळ पट्टा, घनदाट हिरवाई, विविध वनस्पती, निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि समृद्ध कांदळवने यांमुळे जिल्ह्यात फुलपाखरांसाठी पोषक अधिवास निर्माण झाला आहे. तब्बल 147 प्रजातींची फुलपाखरे रायगडच्या निसर्गसंपदेत रंग भरत असून, त्यात महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ‘ब्ल्यू मॉरमॉन’ अर्थात राणी पाकोळी आणि पश्चिम घाटातील मोठ्या आकाराच्या दुर्मिळ फुलपाखरांपैकी एक असलेल्या ‘सदर्न बर्डविंग’चाही समावेश आहे.
 
फुलांवर अलगद विसावणारे, एका फुलावरून दुसर्‍या फुलाकडे बागडणारे आणि रंगीबेरंगी पंखांनी निसर्गाला सजवणारे हे जीव केवळ सौंदर्याची उधळण करत नाहीत, तर पर्यावरणाचा समतोल राखण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. रायगड जिल्ह्यात फुलपाखरांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या विविध वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. नर-मादीच्या मिलनानंतर मादी विशिष्ट वनस्पतींच्या पानांवर अंडी घालते.
 
कडुनिंब, कढीपत्ता, सीताफळ, रामफळ, लिंबू, कदंब आणि अशोक यांसारख्या वनस्पती अनेक फुलपाखरांच्या जीवनचक्रात महत्त्वाच्या ठरतात. सोनटक्का आणि पानफुटीसारख्या वनस्पतींमुळेही काही प्रजातींच्या वाढीस पोषक वातावरण मिळते. त्यामुळे रायगडची हिरवीगार वनराई फुलपाखरांसाठी जणू नैसर्गिक घरच ठरली आहे. ग्रीन टच नर्सरीचे मालक अमित निंबाळकर यांच्या म्हणण्यानुसार, घराच्या परसबागेत फुलपाखरे आकर्षित करण्यासाठी उपयुक्त वनस्पती लावण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. मात्र संकटांची सावली गडद होत आहे.
 
तणनाशकांचा वाढता वापर, झपाट्याने होणारे औद्योगिकीकरण आणि प्रदूषण यांमुळे फुलपाखरांना उपयुक्त असलेल्या वनस्पती नष्ट होण्याचा धोका वाढला आहे. परिणामी, अंडी, अळ्या आणि सुरवंटांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला अधिवासही धोक्यात येत आहे. माणगाव येथील प्राणी, पक्षी आणि फुलपाखरांचे अभ्यासक शंतनू कुवेस्कर यांनी रायगडमधील निसर्गसंपदा आणि तुलनेने सुरक्षित अधिवासाचे महत्त्व अधोरेखित केले.
 
घराच्या अंगणात पपई, पेरू यांसारखी फळे किंवा सडका बांगडा मासा ठेवूनही काही प्रकारच्या फ ुलपाखरांना आकर्षित करता येते, असे त्यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यात 147 प्रजाती नोंदविण्यात आल्या आहेत. गुलाबी राणी, पितांबरी, सांजपरी, हळदीकुंकू, नील भिरभिरी, मयूर भिरभिरी आणि शुष्क पर्ण यांसारख्या आकर्षक नावांच्या प्रजाती या रंगीबेरंगी वैविध्यात भर घालतात. मात्र, तणनाशकांचा अनियंत्रित वापर या जैवविविधतेसाठी घातक ठरत असल्याचे अलिबाग येथील निसर्ग, फुलपाखरू, प्राणी आणि पक्षी अभ्यासक प्रवीण कवळे यांनी सांगितल