नाशिक | पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून आणि आजार बरा करण्याच्या नावाखाली नाशिकमधील एका कथित भोंदूबाबाने पनवेल येथील म हिलेला साडेसात लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अघोरी पूजेच्या नावाखाली महिलेला अर्धनग्न अवस्थेत बसवून विधी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणी अरुण धोंडू पाटील याच्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल येथील या महिलेला अस्थमाचा त्रास होता. हा त्रास दूर करण्यासाठी नाशिकच्या गंगापूर शिवारात राहणार्या अरुण धोंडू पाटील याच्या कथित दैवी शक्तींबाबत तिला माहिती मिळाली. त्यानंतर त्याच्याशी संपर्क साधण्यात आला. संबंधित व्यक्तीने महिलेला नाशिकला आणण्यासाठी पनवेल येथे वाहन पाठविले.
प्रवासादरम्यान महिला आणि तिच्या पतीच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधून त्यांना नाशिकला नेण्यात आले. तेथे कथित अघोरी पूजाविधी करण्यात आले. त्यानंतर पुन्हा डोळ्यांवर पट्टी बांधून दाम्पत्याला पनवेलला सोडण्यात आले. अशाच प्रकारे दुसर्यांदा त्यांना नाशिकला नेण्यात आले. या विधींनंतर आजारपणात गुण आल्याचा भास झाल्याने दाम्पत्याचा संबंधित व्यक्तीवरील विश्वास वाढला. याच विश्वासाचा फायदा घेत त्याने पैशांचा पाऊस पाडून देण्याचे आमिष दाखविल्याचा आरोप आहे.
त्यानुसार तिसर्यांदा महिला आणि तिच्या पतीला डोळ्यांवर काळी पट्टी बांधून नाशिकमधील गंगापूर रोडवरील बालाजी मंदिर परिसरात नेण्यात आले. तेथे महिलेच्या अंगावरील कपडे काढून तिला पांढरे, पारदर्शक पातळ वस्त्र नेसविण्यात आले आणि त्यावर पाणी टाकण्यात आले. तसेच मासिक पाळीतील रक्ताने माखलेल्या कपड्यांची पूजा करण्यात आली. या विधीसाठी मानवी कवटी, तांदूळ, हळद, कुंकू, गुलालाचे पाणी आणि बुक्का आदी साहित्याचा वापर करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणाची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिक येथील कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी अरुण पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.