उरण | उरण तालुक्यातील मौजे पुनाडे येथील तब्बल ९२.७० एकर सरकारी जमीन बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण ट्रस्टला विद्यापीठ उभारण्यासाठी देण्याच्या प्रक्रियेवरून स्थानिकांच्या हक्कांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गावाच्या भविष्यातील गरजा आणि सार्वजनिक सुविधांसाठी उपयोगी ठरू शकणार्या या जमिनीबाबत निर्णय घेताना स्थानिकांच्या हिताचा विचार व्हावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पंचायत समिती सदस्या कविता रूपेश पाटील यांनी केली आहे.
पंचायत समितीच्या मासिक बैठकीत त्यांनी या प्रक्रियेला विरोध दर्शविणारा ठराव घेण्याची सूचनाही केली. पुनाडे गावाच्या हद्दीत सरकारी खराबा, आकारी पड, महाराष्ट्र शासन आणि गुरचरण अशा नोंदी असलेली सुमारे ११९.५९२ हेक्टर म्हणजेच २९५.५२ एकर जमीन आहे. यापैकी ३७.५१५ हेक्टर अर्थात ९२.७० एकर जमीन विद्यापीठ उभारण्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी स्वामीनारायण संस्थेने केल्याचे सांगण्यात येते. या जमिनीच्या मोजणीसंदर्भात महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी संदीपान देवणे यांनी ६ ऑक्टोबर २०२५ रोजी रायगड जिल्हाधिकार्यांना पत्र पाठविले होते.
त्यावेळी मोजणीसाठी आलेल्या पथकाला ग्रामस्थांनी विरोध केला होता. मात्र, ग्रामस्थांचा विरोध असतानाही पोलीस बंदोबस्तात जमिनीची मोजणी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. पुनाडे गावाच्या वाढत्या गरजा लक्षात घेता या जमिनीचा वापर वाढीव गावठाणासाठी करता येऊ शकतो. भविष्यात घरांसाठी जागेची आवश्यकता भासणार्या नागरिकांसाठी पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
मुलांसाठी क्रीडांगण, नागरिकांसाठी उद्यान आणि इतर सार्वजनिक सुविधा विकसित करण्याचाही विचार करता येईल. दरम्यान, या जमिनीबाबत निर्णय घेताना स्थानिकांच्या हिताचा विचार व्हावा याप्रकरणी लवकरच रायगड जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन ग्रामस्थांच्या मागण्या मांडण्यात येणार आहेत. स्वामीनारायण संस्थेला जमीन देण्याच्या प्रस्तावाचा शासनाने फेरविचार करावा आणि स्थानिकांच्या हिताला प्राधान्य द्यावे, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे कविता पाटील यांनी स्पष्ट केले.