उरणमध्ये ठाकरे सेनेचा दुहेरी एल्गार ! दुष्काळ जाहीर करा, स्मार्ट मीटरचा जाच थांबवा; उद्या आंदोलन

By Raigad Times    21-Oct-2026
Total Views |
 uran
 
उरण | पावसाअभावी उरण तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, तसेच अदानीच्या स्मार्ट मीटरसह वाढीव वीजबिलांच्या प्रश्नावर तोडगा काढावा, या मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण तालुका व शहर शाखेने गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी आंदोलनाची हाक दिली आहे.
 
तहसील कार्यालय आणि वीज कार्यालयात निवेदने देऊन जनतेच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. पावसाने दडी मारल्याने उरण तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी तहसील कार्यालयात निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.
 
दुसरीकडे, स्मार्ट मीटर आणि वाढीव वीजबिलांमुळे नागरिकांना भेडसावणार्‍या समस्यांबाबत वीज कार्यालयात निवेदन देऊन तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली जाणार आहे. जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर गजानन भोईर यांनी पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
 
जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना, युवती सेना तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच आणि विविध अंगीकृत संघटनांच्या पदाधिकार्‍यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पक्षाच्या काही आंदोलनांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये होत आहे.
 
महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी असलेल्या काही पदाधिकार्‍यांची आंदोलनातील अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांवर आंदोलनाची हाक देतानाच वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून कार्यकर्त्यांना बळ द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गुरुवारी सकाळी ११.३० वाजता उरण शहरातील शिवसेना शाखेत जमून तहसील कार्यालय, वीज कार्यालयात निवेदने देण्यात येणार आहेत. दुष्काळाचा प्रश्न, वाढीव वीजबिलांसह स्मार्ट मीटरच्या समस्यांवर प्रशासन काय भूमिका घेते, तसेच आंदोलनाला पक्षाचे कार्यकर्ते किती प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.