खोपोली | खालापूर तालुक्यातील सावरोली येथील एल अँड टी कंपनीतील स्थानिक रोजगाराच्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या वादानंतर कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यात अखेर समेट झाला. स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची भूमिका घेतली आहे.
मात्र, राजकीय मतभेद कायम असून, आगामी निवडणुकीत एकमेकांविरोधात लढण्याची भूमिका दोघांनीही स्पष्ट केली.सावरोली येथील एल अँड टी कंपनीत स्थानिकांना रोजगारात प्राधान्य मिळावे, यासाठी जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे सातत्याने पाठपुरावा करत होते. कंपनी व्यवस्थापनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता.
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार अभय चव्हाण यांच्या दालनात ग्रामस्थ आणि कंपनी व्यवस्थापनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहूल पाटील, पोलिस निरीक्षक प्रकाश रायन्नवर, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे, एल अँड टी कंपनीचे प्रतिनिधी, सावरोलीचे सरपंच समाधान बैलमारे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अंकित साखरे, काँग्रेसचे खोपोली शहराध्यक्ष सागर पवार, आपचे तालुकाध्यक्ष युसुफ पठाण आणि मनसेचे शहराध्यक्ष सतीश येरूणकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
बैठकीत स्थानिक रोजगाराच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना आमदार महेंद्र थोरवे यांचे बंधू मनोहर थोरवे यांनी हस्तक्षेप केल्याने वाद निर्माण झाला. यावेळी संतोष बैलमारे यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर सुधाकर घारे यांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या घडामोडींनंतर खालापूर पोलिस ठाण्याबाहेर दोन्ही गटांचे कार्यकर्ते जमू लागले.
यादरम्यान आमदार महेंद्र थोरवे आणि त्यांचे बंधू पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर तणावात आणखी वाढ झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहूल पाटील आणि पोलिस निरीक्षक प्रकाश रायन्नवर यांनी मध्यस्थी केली. त्यांच्या प्रयत्नांतून थोरवे आणि घारे यांच्यात चर्चा झाली. रात्री आठच्या सुमारास झालेल्या या चर्चेनंतर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना कामे देण्याबाबत ५० टक्के वाटपाचा तोडगा निघाल्याचे सांगण्यात आले.
स्थानिकांच्या हितासाठी एकत्र येण्याची भूमिका : महेंद्र थोरवे
"एल अँड टी कंपनीतील कामांवरून गेल्या दोन-तीन महिन्यांपासून स्थानिक पातळीवर मतभेद सुरू होते. या प्रकल्पात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कामे मिळावीत, अशी आमची भूमिका आहे. मात्र, आपापसांतील वाद आणि स्पर्धेमुळे कंपन्यांना फायदा होतो, तर स्थानिकांचे नुकसान होते.
स्थानिक कंत्राटदारांमध्ये स्पर्धा वाढल्यास कामांचे दर कमी होतात आणि त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. याउलट, दोन्ही बाजूंनी सामंजस्याने निर्णय घेतल्यास स्थानिकांना अधिक फायदा होऊ शकतो. खालापूर तालुक्यात येणार्या नवीन प्रकल्पांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे आणि त्यांचे आर्थिक नुकसान टाळावे, यासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करणार आहोत. राजकारण आणि निवडणुका त्यांच्या जागी आहेत.
सुधाकर घारे आणि माझ्यातील टिका टिपण्या सुरुच राहतील; मात्र स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा आहे. मतदारसंघाचा विकास आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे,” असे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले.
स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी समन्वय : सुधाकर घारे
"एल अँड टी कंपनीतील कामांवरून गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मतभेद सुरू होते. या प्रकल्पात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, अशी आमची भूमिका आहे. संतोष बैलमारे हे यापूर्वी सरपंच होते आणि आता जिल्हा परिषद सदस्य आहेत.
त्यांना आणि त्यांच्या गटाला योग्य न्याय मिळावा, तसेच आमच्या कार्यकर्त्यांनाही कामाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी चर्चा करून एकत्रितपणे निर्णय घेतला आहे. सरपंच समाधान यांच्यासह गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांचा सहभाग वाढविण्याचा आमचा प्रयत्न राहील. स्थानिकांना रोजगारात प्राधान्य मिळावे, यासाठी दोन्ही बाजूंनी समन्वय साधून काम केले जाईल.
राजकीय मतभेद असले, तरी स्थानिकांच्या हितासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. आगामी निवडणुकीत आम्ही एकमेकांसमोर लढू; मात्र स्थानिकांच्या प्रश्नांवर सहकार्याची भूमिका कायम ठेवली पाहिजे,” अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी मांडली. दरम्यान, सावरोलीतील रोजगाराचा प्रश्न हा केवळ राजकीय वादाचा विषय नसून स्थानिक तरुणांच्या भविष्याशी संबंधित आहे. त्यामुळे समन्वय साधून रोजगाराचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.