नारायण गडावरील दसरा मेळाव्यातून; मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

५०० कोटींच्या देवाण-घेवाणीवरुन आरोपांच्या फैरी

By Raigad Times    21-Oct-2026
Total Views |
beed
 
बीड | धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या बीडच्या नारायण गडावर आज मनोज जरांगे-पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. दसर्‍या मेळाव्यातील या भाषणातून मनोज जरांगे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.
 
एकनाथ शिंदेसाहेब, तुम्ही भाजपकडून ५०० कोटी रुपये आणले आणि श्रीकांत शिंदेंकडून मला दिले असे भाजप नेत्यांना सांगितले का? याचे उत्तर तुम्ही आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत द्या, असे आव्हानदेखील मनोज जरांगे यांनी दिले. एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही दिल्लीतील भाजपच्या लोकांना माझ्याबद्दल काय सांगितले? मनोज जरांगे पाटलांना ५०० कोटी रुपये द्यायचेत आणि एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही भाजपकडून ५०० कोटी रुपये घेऊन मला दिलेत असं तुम्ही भाजपच्या नेत्याला सांगितले का?, कारण ते नेते कुजबुज करायला लागले आहेत.
 
मनोज जरांगे पाटलांना श्रीकांत शिंदे यांच्या हाताने ५०० कोटी रुपये पोहोचलेत.. जरांगे पाटील आपला थर्ड पर्सन आपला असं शिंदेसाहेब तुम्ही म्हणाले का???? तुम्ही मला पाचशे कोटी रुपये दिले का? तुम्ही मला जर दिले नसतील तर मग भाजप नेमकं तुम्हाला संपवतोय का तुम्ही मला संपवतात याचा छडा मी लावल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
सरकारच्या ५ हजारांच्या मदतीवरुन निशाणा
शेतकरी संकटात आहे, शेतकर्‍यांची लढाई आपल्याला सगळ्यांना एकत्र लढायची आहे. भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. आणखी दोन महिन्यांनी भयानक परिस्थिती होणार आहे. पाणी मागितलं तर एकमेकांना द्या, एकमेकांची मजा बघू नका. मी शेतकरी संघटना, कृषी तज्ज्ञांना एकत्र बोलवतो.
 
शेतकर्‍यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत घ्यायची, अशी मागणीही जरांगे पाटलांनी आपल्या भाषणातून केली. शेतकर्‍यांना किती पैसे मिळाले, पाच हजार. पाच हजार यांनी मदत दिली, जरी दिले तर आठ दिवस हेलपाटे घालण्यात जातील. २०० रुपये पेट्रोलचे एकूण २ हजार जाणार, जेवणाचे ३२०० रुपये जाणार, असे म्हणत जरांगे पाटलांनी शेतकर्‍यांना देऊ केलेल्या ५००० रुपयांच्या मदतीचे गणितच मांडले.
 
दरम्यान, जीएसटी भरायचा आपण आणि बंगले यांचे मोठे झाले. समाजावर आज संकट आलंय, मर्द असाल तर शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे रहाल. आपल्यावर वाईट संकट आलंय, असे म्हणत मनोज जरांगे पाटलांनी ५ प्रमुख मागण्या सरकारकडे केल्या.
जरांगेंच्या सरकारकडे प्रमुख मागण्या
* शेतकर्‍यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्या.
* शेतकर्‍याची संपूर्ण कर्जमाफी करा.
* पिक विम्याचे सगळे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करा.
* शेतकर्‍यांचे रखडलेले अनुदान सगळे घ्यायचे.
* चारा छावण्या गावागावात उभ्या करा.