महाड | महाड औद्योगिक वसाहतीतील इप्का लॅबोरेटरीज कंपनीला १४ ऑक्टोबरच्या म ध्यरात्री कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक टाळे ठोकण्यात आल्याने कामगारांध्ये संतापाची लाट उसळली आहे. कंपनीच्या स्थलांतराला कामगारांचा विरोध नसून, गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावणार्या आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कामगारांचा संपूर्ण हिशेब करून द्यावा, तसेच स्थलांतरित होणार्या कामगारांच्या वेतनात वाढ करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मात्र, कंपनी बंद केल्यानंतर व्यवस्थापनातील एकही अधिकारी कामगारांच्या संपर्कात नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा आणि भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाड औद्योगिक वसाहतीतील इप्का लॅबोरेटरीज कंपनीच्या काम गारांची २ ऑक्टोबर २०२६ रोजी बैठक घेण्यात आली होती.
या बैठकीत कंपनीचे वर्धा जिल्ह्यातील हिंगणी येथे स्थलांतर करण्यात येणार असून, सर्व कामगारांना तेथे सामावून घेतले जाईल, असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते. या बैठकीला कंपनीचे एचआर प्रमुख साईदत्त नंदा, अभिषेक घोलप, अॅड. परांजपे, तसेच कामगार उत्कर्ष सभेचे अध्यक्ष जितेंद्र जोशी आणि कैलास मोरे उपस्थित होते. २०२१ मधील महापुरामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले होते.
त्यानंतर कंपनीची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळाले नसल्याने स्थलांतराचा निर्णय घेण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले. कंपनीचे सर्व कामगार हिंगणी येथे स्थलांतरित केले जातील, तर स्थलांतरास तयार नसलेल्या कामगारांना त्यांच्या सेवेचा संपूर्ण हिशेब आणि ग्रॅच्युइटी देण्यात येईल, असेही व्यवस्थापनाने स्पष्ट केले होते. मात्र, १४ ऑक्टोबरच्या रात्री कंपनीला टाळे ठोकण्यात येणार असल्याची कोणतीही पूर्वकल्पना कामगारांना देण्यात आली नव्हती.
अचानक कंपनी बंद करून व्यवस्थापनाने काम गार उत्कर्ष सभेला १२ ऑक्टोबर रोजी दिलेले पत्र कंपनीच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले. या प्रकारामुळे कामगारांध्ये नाराजी पसरली आहे. व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन त्यांच्या रोजगाराबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, तसेच सेवाकाळानुसार देय असलेली रक्कम आणि इतर लाभांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. कामगारांना न्याय मिळाला नाही, तर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला तरी मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.