पनवेल | दूध व दुग्धजन्य पदार्थांध्ये भेसळ होत असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तळोज्यातील तीन दूध प्रकल्पांवर कारवाई केली. तपासणीदरम्यान उत्पादन प्रक्रियेतील स्वच्छता आणि दूध साठवणुकीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन आढळल्याने तिन्ही आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.
या कारवाईत १,४९४ लिटर दूध नष्ट करण्यात आले, तर दही जप्त करण्यात आले. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीतील तोंडरे गावाजवळ असलेल्या बालाजी औद्योगिक पार्कमधील मातेश्वरी फूड्स, सावरीया मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट आणि रॉयल फूड्स या आस्थापनांची एफडीएच्या पथकाने तपासणी केली.
सहाय्यक आयुक्त अजित मैत्रे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान मातेश्वरी फ ूड्समधील ५९८ लिटर आणि सावरीया मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टमधील ८९६ लिटर दूध नष्ट करण्यात आले. रॉयल फूड्समधील दही जप्त करण्यात आले. दुधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सहाय्यक आयुक्त अजित मैत्रे यांनी सांगितले.
या प्रकरणी बासदेव मोहन यादव, संजय शंकर यादव, नारायणलाल गणेशलाल दांगी, आशा संजय यादव, राधेश्याम रामकबल यादव आणि संतोष बाबुराव ठाकूर या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्री केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, तळोजा पोलीस पुढील तपास करीत आहेत. दुधाच्या नमुन्यांचे प्रयोगशाळा अहवाल अद्याप प्राप्त झालेले नसल्याने, दुधात भेसळ असल्याबाबतचा अंतिम निष्कर्ष अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.