दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा

By Raigad Times    20-Oct-2026
Total Views |
lekh
 
उमाजी म. केळुसकर | ज्येष्ठ पत्रकार | भारतीय संस्कृती ही सण, उत्सव आणि परंपरांची एक समृद्ध गुंफण आहे. वर्षभरात येणार्‍या विविध सणांमध्ये विजयादशमी म्हणजेच ‘दसरा’ या सणाला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा‘ ही म्हण केवळ उक्ती नसून, ती आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि जनमानसातील उत्साहाचा जिवंत दस्तऐवज आहे. पावसाळ्याची सांगता होऊन शरदाच्या प्रसन्न वातावरणात येणारा हा सण मनामनांत एक नवी उमेद घेऊन येतो.
 
परंतु, यंदाच्या दसर्‍याला महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशात अलनिनोच्या प्रभावामुळे दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाची ओढ आणि पाण्याचे संकट यामुळे शेतकर्‍यांचे डोळे चिंतेने व्यापले आहेत; तरीही अशा बिकट परिस्थितीतही संकटांशी लढा देत हा उत्सव आशेचा किरण बनून येतो. दसरा हा केवळ एक दिवसाचा उत्सव नाही, तर तो नऊ दिवसांच्या अखंड शक्तिउपासनेची, म्हणजेच नवरात्राची फलश्रुती आहे.
 
नऊ दिवस दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केल्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. हा दिवस अनिष्टावर इष्टाचा, असत्यावर सत्याचा आणि धर्माचा अधर्मावर झालेला विजय दर्शवतो. पौराणिक कथांनुसार, याच दिवशी जगदंबा दुर्गेने महिषासुर या राक्षसाचा वध करून देवांना आणि मानवांना त्याच्या त्रासातून मुक्त केले होते. तसेच, प्रभू श्रीरामाने लंकेच्या रावणाचा पराभव करून सत्याची पताका फडकावली, तोही हाच शुभ दिवस होता.
 
म्हणूनच हा दिवस पराक्रमाचा, शौर्याचा आणि विजयाचा दिवस मानला जातो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भात तर दसर्‍याचे महत्त्व अधिकच सखोल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांचे सैन्य दसर्‍याच्या दिवशी सीमोल्लंघन करत असे. पावसाळा संपल्यानंतर मोहिमेवर निघण्यासाठी, शत्रूच्या सीमा ओलांडून आपल्या स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जात असे.
 
छत्रपतींच्या या पराक्रमी परंपरेची आठवण आजही सीमोल्लंघनाच्या रूपाने जपली जाते. आज जरी सैन्याची ही मोहिमांची रूपे बदलली असली, तरी प्रत्येक मानवाने आपल्या मनातील आळस, भीती, नकारात्मकता आणि वाईट विचारांच्या सीमा ओलांडून प्रगतीकडे पाऊल टाकणे, हेच आधुनिक काळातील खरे सीमोल्लंघन ठरते. दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. त्यामुळेच या दिवशी कोणत्याही नवीन कार्याचा प्रारंभ करणे अत्यंत शुभ मानले जाते.
 
नवीन वस्तूंची खरेदी, वाहनांची पूजा, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा लहान मुलांच्या शिक्षणाचा श्रीगणेश या दिवशी मोठ्या उत्साहाने केला जातो. सोन्यासारखी झेंडूची पिवळीधमक फुले, आपट्याची पाने आणि आंब्यांच्या पानांचे तोरण घराघरांच्या दारांवर डौलाने फडकू लागते. झेंडूच्या फुलांचा वास आणि आपट्याच्या पानांची देवाणघेवाण वातावरणामध्ये एक वेगळाच दरवळ आणि मांगल्य निर्माण करते. या सणाचे सर्वात सुंदर आणि भावुक वैशिष्ट्य म्हणजे आपट्याची पाने ज्याला आपण सोने म्हणतो, त्याचे वाटप करणे.
 
‘सोने घ्या, सोन्यासारखे राहा’ असे म्हणत एकमेकांना आपट्याची पाने दिली जातात. या परंपरेमागे पांडवांच्या अज्ञातावासाची आणि कौत्साच्या गुरुदक्षिणेची पौराणिक कथा जोडलेली आहे. परंतु, सामाजिक दृष्टिकोनातून पाहिल्यास ही परंपरा नात्यांमधील कटुता संपवून स्नेहाचा सुवर्णस्पर्श देणारी आहे. वर्षभरात झालेले रुसवे-फुसवे, मानापमान विसरून एकमेकांना सोने देणे आणि शुभेच्छा देणे हे सामाजिक सलोख्याचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे.
 
आपट्याचे साधे पान या दिवशी सोन्याचे मोल प्राप्त करते, कारण त्यामागे जोडलेली भावना ही अमूल्य असते. आजच्या काळात निसर्गाच्या लहरीपणाचे मोठे आव्हान आपल्यासमोर उभे ठाकले आहे. अलनिनोच्या सावटामुळे देशातील आणि राज्यातील अनेक भागांत पर्जन्यमानाची मोठी तूट भासली आहे. विहीर, कूपनलिका कोरड्या पडल्या असून शेतातील पिके सुकू लागली आहेत.
 
ग्रामीण भागात चार्‍याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या दुष्काळी संकटात आपल्या बळीराजाचे मनोधैर्य खचू न देणे हे समाजाचे आद्य कर्तव्य आहे. दसर्‍याची ही विजयादशमी आपल्याला केवळ आनंद साजरा करण्याचीच नव्हे, तर दुष्काळासारख्या अस्मानी संकटावर विजय मिळवण्यासाठी एकत्र येण्याची आणि एकमेकांना सावरण्याची प्रेरणा देते. आजच्या आधुनिक आणि वेगाने बदलणार्‍या जगात दसर्‍याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आज मानवी समाज भौतिकदृष्ट्या जितका प्रगत झाला आहे, तितकाच तो मानसिक पातळीवर विविध आव्हानांचा सामना करत आहे.
 
द्वेष, मत्सर, स्पर्धा, ताणतणाव आणि नकारात्मकेचा रावण आज प्रत्येक माणसाच्या मनात कुठतरी दडलेला आहे. त्यामुळेच केवळ पुतळ्याच्या रूपातील रावणाचे दहन करून चालणार नाही, तर आपल्या मनातील विकारांचा, अहंकाराचा आणि वाईट प्रवृत्तींचा नाश करणे ही काळाची गरज बनली आहे. दसरा हा सण आपल्याला स्वतःमध्ये लपलेल्या या महिषासुराचा पराभव करण्याची प्रेरणा देतो.
 
तसेच, दसरा हा सण श्रम आणि शस्त्रांच्या पूजेचाही सण आहे. या दिवशी शस्त्रपूजा केली जाते. पूर्वीच्या काळात राजे-महाराजे आणि सैनिक आपल्या शस्त्रांची पूजा करत असत. आजच्या काळात शेतकरी आपल्या नांगराची आणि अवजारांची, कारागीर आपल्या हत्यारांची, चालक आपल्या वाहनांची आणि विद्यार्थी किंवा व्यापारी आपल्या पुस्तकांची व संगणकाची पूजा करतात. ज्या साहित्याच्या आणि साधनांच्या बळावर आपण आपले जीवन जगवतो, उपजीविका भागवतो, त्या सर्व साधनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.
 
भारतीय संस्कृतीतील ही कृतज्ञतेची भावना अत्यंत उदात्त आणि शिकण्यासारखी आहे. दसरा हा सण आपल्याला संघटित राहण्याची आणि एकत्र येण्याची शिकवण देतो. जेव्हा संपूर्ण कुटुंब, गल्ली, गाव आणि समाज एकत्र येऊन उत्सव साजरा करतो, तेव्हा आनंदाचा हा गुणाकार होतो. घराघरांमध्ये तयार होणारे पक्वान्न, नवीन कपड्यांची खरेदी आणि लहान मुलांच्या चेहर्‍यावरील आनंद यामुळे संपूर्ण आसमंत उत्साहाने भरून जातो.
 
निसर्गाची साथ नसली तरी मानवी जिद्द आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर आपण आनंदाचा हा दिवा तेवत ठेवू शकतो. म्हणून म्हटले जाते की या सणात आनंदाचा कोणताही तोटा उरत नाही. दसरा हा केवळ परंपरेचा भाग नसून तो जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संकटे, अपयश आणि अंधार येत असतो.
 
परंतु, अंधार कितीही गडद असला तरी सत्याचा, प्रकाशाचा आणि जिद्दीचा विजय निश्चित असतो, हा विश्वास दसरा आपल्याला देतो. आपल्या संस्कृतीने दिलेल्या या अमूल्य ठेव्याचे जतन करणे आणि दुष्काळासारख्या कठीण प्रसंगात एकमेकांना मदतीचा हात देणे हेच खरे सीमोल्लंघन ठरेल. या विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आपण सर्वांनी आपल्या मनातील नकारात्मकता सोडून, ज्ञानाचे आणि प्रेमाचे सोने वाटूया. आपापसातील दरी मिटवून, परस्पर सहकार्याने आणि उत्साहाने प्रगतीच्या नव्या सीमा ओलांडूया. जेव्हा प्रत्येक घरात, प्रत्येक मनात विचारांचे सोने पिकेल, तेव्हाच खर्‍या अर्थाने ‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ ही उक्ती सार्थ ठरेल.