नवी मुंबई पोलिसांकडून २३ गुन्हे उघड ; पाचजण ताब्यात; १८.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Raigad Times    02-Oct-2026
Total Views |
 navi mumbai
 
नवी मुंबई | नवी मुंबईत चेन स्नॅचिंग, घरफोडी,जबरी चोरी आणि अंमली पदार्थ तस्करी असे विविध २३ गुन्हे नवी मुंबई गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी उघडकीस आणले असून याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून १८ लाख ४२ हजार ३०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
सानपाडा, वाशी आणि कोपरखैरणे परिसरात चेन स्नॅचिंग करणार्‍या एका डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी अटक केली. ऑनलाईन जुगारात पैसे गमावल्यानंतर पुन्हा जुगार खेळण्यासाठी तो चेन स्नॅचिंग करत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून ६८.८४ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली स्कुटी असा सुमारे ८ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 
या कारवाईत नऊ गुन्हे उघडकीस आले. कळंबोलीतील एनडीपीएस प्रकरणातील पाहिजे आरोपीला पनवेल येथून ताब्यात घेण्यात आले. या आरोपीविरुद्ध यापूर्वी गंभीर स्वरूपाचे २४ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून सराईत घरफोडी करणार्‍या आरोपीचा शोध घेण्यात आला. त्याला मुंबईतील नागपाडा परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
 
त्याच्याकडून सोन्याची लगड आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून, या कारवाईत घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आले. पनवेल तालुका परिसरातील जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एका आरोपीला इंदापूर येथून अवघ्या चार तासांत ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मोबाईल, चाकू, दोन लोखंडी कोयते आणि बॅग जप्त करण्यात आली.
 
या तपासातून राज्यातील विविध ठिकाणी दाखल असलेले सहा गुन्हे उघडकीस आले. याशिवाय, सीबीडी बेलापूर बसस्थानक परिसरात ४१.०५ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. त्याची किंमत सुमारे ८ लाख ३० हजार रुपये असून, हे हेरॉईन पंजाबमधून आणल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोद शेवाळे आणि उपायुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.