म्हसळा | म्हसळा नगरपंचायतीतील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून, शिवसेना शिंदे गटाच्या उपनगराध्यक्षा कमल रविंद्र जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिले आहे. नगराध्यक्ष सुनील शेडगे यांच्याकडे राजीनामा सादर केल्याचे समजते.
अवघ्या साडेतीन महिन्यांच्या कार्यकाळानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने म्हसळा शहरातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. म्हसळा नगरपंचायतीतील राजकीय समीकरणांमध्ये सातत्याने बदल होत आहेत. पक्षांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव झाली.
त्यानंतर काही महिन्यांपूर्वी झालेल्या घडामोडींमध्ये राष्ट्रवादीचे सुनील शेडगे नगराध्यक्ष, तर शिवसेना शिंदे गटाच्या कमल जाधव उपनगराध्यक्षा झाल्या होत्या. कमल जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून पक्षांतर केल्यानंतर शिवसेनेने त्यांच्यावर उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती.
अनुसूचित जमाती समाजातील महिला प्रतिनिधीला नगरपंचायतीतील महत्त्वाच्या पदावर संधी देत सामाजिक प्रतिनिधित्वाचा सन्मान करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, उपनगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारून अवघे साडेतीन महिने होत असतानाच त्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी काही कालावधी शिल्लक असताना झालेल्या या राजीनाम्यामुळे नगरपंचायतीतील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे.
नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील विविध विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा असताना उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा समोर आल्याने नागरिकांमध्येही चर्चांना सुरुवात झाली आहे. राजीनाम्यामागील नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे म्हसळा नगरपंचायतीतील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.