शिलार धरणाला माझाही तीव्र विरोध -आ.महेंद्र थोरवे , मुख्यमंत्र्यांना प्रकल्प रद्द करण्यासाठी विनंती करणार

By Raigad Times    02-Oct-2026
Total Views |
karjat 
 
कर्जत | कर्जत तालुक्यातील चिलार नदीवर प्रस्तावित शिलार धरणाला माझा १०० टक्के विरोध असून, स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शिलार धरण जनआंदोलन समितीला दिले.
 
नवी मुंबईतील सिडको क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी कर्जत तालुक्यातील चिलार नदीवर पाच ग्रामपंचायतींच्या हद्दीत धरण प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ बाधित होणार असल्याने त्याला विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाला कर्जत तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी शेतकरी कर्जत शहरात दाखल झाले.
 
शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी शिलार धरणाला विरोध दर्शविणारी निवेदने देण्यात आली. आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेनेच्या वतीने निवेदन स्वीकारले. भाजपच्या वतीने माजी आमदार सुरेश लाड, शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कर्जत पंचायत समितीच्या सभापती नमिता घारे यांनी निवेदन स्वीकारले.
 
यावेळी शिलार आंदोलनाचे प्रमुख दिनेश रसाळ, योगेश सावंत, अक्षय तितकारे, संतोष कदम, काशीनाथ रसाळ, अ‍ॅड.अहिर, काशीनाथ निरगुडे, यशवंत निरगुडे, दिलीप रसाळ, मनोज भोईर, महादू शेंडे, गणेश भगत, हरेश अहिर,राम कातवरा, वसंत केवारी, संभाजी कदम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. निवेदन स्वीकारल्यानंतर आमदार थोरवे यांनी प्रस्तावित प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या शेतकर्‍यांशी संवाद साधला.
 
यावेळी त्यांनी सांगितले की, धरणाला स्थानिकांचा विरोध असून सुमारे २२ गावे व वाड्या बाधित होण्याची शक्यता आहे. कर्जत तालुक्यात कोंढाणे, पाली, मोरबे यांसारखे धरण प्रकल्प आधीच आहेत. त्यामुळे शिलार धरणाच्या प्रस्तावाबाबत स्थानिकांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. शिलार धरणाबाबत शासनाने स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नसल्याचे थोरवे यांनी सांगितले.
 
प्रशासनाकडूनही या प्रकल्पाबाबत आपल्याला अद्याप पुरेशी माहिती मिळालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकर्‍यांचा प्रकल्पाला विरोध आहे. त्यांची भूमिका लक्षात घेता माझाही शिलार धरणाला पूर्णपणे विरोध आहे. शासनाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे स्थानिकांच्या सोबत उभे राहून या प्रकल्पाला विरोध करणार आहे,” अशी भूमिका आमदार थोरवे यांनी मांडली. पाचही ग्रामपंचायतींमधील शेतकरी आणि ग्रामस्थांना एकत्र घेऊन मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल. शिलार धरणाचा प्रस्ताव कायमचा रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासनही आमदार थोरवे यांनी यावेळी दिले.