दिवेआगर समुद्रात ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू , समुद्रकिनारी आक्रोशाने काळीज पिळवटले

आळंदीच्या विनर्स अकॅडमीचे अकरावी-बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी सहलीसाठी आले होते रायगडात...

By Raigad Times    02-Oct-2026
Total Views |
borlipanchatan 
 
बोर्लीपंचतन | श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रात बुडून आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. आळंदीच्या ‘विनर्स अकॅडमी’चे हे विद्यार्थी होते. अकॅडमीच्या ४८ जणांचा ग्रुप येथे सहलीसाठी आला असताना ही दुर्घटना घडली.
 
या दुर्घटनेने दिवेआगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, समुद्रकिनारी तणावाचे आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले होते. मृत विद्यार्थ्यांमध्ये यश किरण वानखेडे, सोहम तुकाराम भांडवलकर, तन्मय दत्तात्रय वहिले, कौस्तुभ संदीप दौंड, कैवल्य सतीश वासनकर, राजवीर युवराज वहिले, प्रणव रामदास बनसोडे, सुमित भरत अहिरे यांचा समावेश आहे. हे सर्व अकरावी व बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी असून, १६ ते १७ वयोगटातील आहेत.
 
विनर्स अकॅडमीचे २५ विद्यार्थी, १७ मुली आणि सहा शिक्षक असे एकूण ४८ जणपर्यटनासाठी दिवेआगर समुद्रकिनारी आले होते. पर्यटनाचा आनंद घेत असताना ग्रुपमधील आठ विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र पावसामुळे किनार्‍यालगतच्या वाळूमध्ये खड्डे निर्माण झाल्याने पाण्याच्या खोलीचा अंदाज विद्यार्थ्यांना आला नाही. त्यामुळे ते पुढे समुद्रात पोहत गेले आणि अचानक खोल पाण्यात बुडाले. विद्यार्थी बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या सहकार्‍यांनी मदतीसाठी आक्रोश सुरू केला.
 
त्यावेळी दिवेआगर समुद्रकिनारी वॉटर स्पोर्ट्सचा व्यवसाय करणारे बाबू साळुंखे तातडीने मदतीसाठी धावून गेले. त्यांनी समुद्रात उतरून बुडालेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
 
बुडालेल्या सर्व आठ विद्यार्थ्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले; मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पर्यटनासाठी आनंदाने दिवेआगरला आलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली. आपल्या सहकार्‍यांना गमावल्याने विद्यार्थ्यांचा आक्रोश सुरू होता.
 
हा हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग पाहून समुद्रकिनारी उपस्थित नागरिक आणि पर्यटकही भावूक झाले. काही क्षणांपूर्वी आनंदाने गजबजलेल्या समुद्रकिनार्‍यावर या दुर्घटनेनंतर शोकमय वातावरण निर्माण झाले.
 
दिवेआगर समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा समुद्राच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या सर्व विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मृतांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. - भरत गोगावले, पालकमंत्री, रायगड
 
दिवेआगर समुद्रकिनारी पाण्याचा अंदाज न आल्याने आळंदी येथील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. दुर्घटनेत प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. -अदिती तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री