अवैध हातभट्टी दारुवाल्यांचे धाबे दणाणल ,गालसुरे काठी, निगडी काठी येथे छापे; 55 हजारांची दारु, रसायन जप्त,चौघांवर गुन्हे

श्रीवर्धन पोलिसांची धडक कारवाई

By Raigad Times    19-Oct-2026
Total Views |
 shreewardhan
 
श्रीवर्धन । अवैध हातभट्टी दारूच्या व्यवसायाविरुद्ध श्रीवर्धन पोलिसांनी धडक कारवाई करत 55 हजार 500 रुपये किमतीची दारु, बिअरच्या बाटल्या आणि दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन जप्त केले. गालसुरे काठी आणि निगडी काठी परिसरात 17 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
खाडीकिनारी ठिकठिकाणी लपवून ठेवलेले बेवारस रसायनही पोलिसांनी जागीच नष्ट केले. गुप्त बातमीदारामार्फत या परिसरात बेकायदेशीररीत्या हातभट्टीची दारू विकली जात असल्याची आणि दारू तयार करण्यासाठी रसायनाचा साठा करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या आदेशाने दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.
 
पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राठोड व त्यांच्या पथकाने दोन्ही ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून ही कारवाई केली. या कारवाईत 650 मिली क्षमतेच्या लंडन पिल्सनर बिअरच्या 58 बाटल्या, ज्यांची किंमत 10 हजार 150 रुपये आहे, जप्त करण्यात आल्या. याशिवाय विविध ड्रममध्ये साठवलेले एकूण 900 लिटर हातभट्टीसाठी वापरले जाणारे रसायन, ज्याची किंमत 45 हजार रुपये आहे, तसेच आठ लिटर तयार हातभट्टीची दारू, ज्याची किंमत 800 रुपये आहे, असा एकूण 55 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
 
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजू सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राठोड आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. दरम्यान, हातभट्टीची दारू तयार करणे, साठवणे आणि विक्री करणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याने अशा अवैध व्यवसायांबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन रायगड पोलीस प्रशासनाने केले आहे. या कारवाईमुळे श्रीवर्धन परिसरातील अवैध दारू व्यवसायाविरुद्ध पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.