पाणीटंचाई टाळण्यासाठी पाली नगरपंचायत सज्ज ; डिसेंबरऐवजी ऑक्टोबरमध्येच केटी बंधार्‍यावर प्लेट लावण्याचे काम सुरु

By Raigad Times    19-Oct-2026
Total Views |
 sudhagad pali
 
सुधागड-पाली । यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी उन्हाळ्यात पाली शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पाली नगरपंचायतीने आतापासूनच पाणी साठवणूक आणि पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर भर दिला आहे. आंबा नदीतील उपलब्ध पाणीसाठा अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी नदीवर दोन ठिकाणी लघु बंधार्‍यांची उभारणी पूर्ण करण्यात आली आहे.
 
तसेच दरवर्षी डिसेंबर महिन्यात केटी बंधार्‍यावर पाणी अडवण्यासाठी प्लेट लावण्यात येतात; मात्र यंदा संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून आले आहे. याशिवाय पाणीपुरवठा करणार्‍या ऑक्टोबर महिन्यातच हे काम सुरु करण्यात पाइपलाइनमधील गळती रोखण्यावरही नगरपंचायतीने लक्ष केंद्रीत केले आहे. या उपाययोजनांमुळे आगामी उन्हाळ्यात शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
पाली शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आंबा नदीतील पाणीसाठा महत्त्वाचा आहे. दरवर्षी पाटबंधारे विभागामार्फत डिसेंबर महिन्यात केटी बंधार्‍यावर प्लेट लावून नदीतील पाणी अडवले जाते. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन वेळेत करणे आवश्यक बनले आहे. ही बाब लक्षात घेऊन पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार करून केटी बंधार्‍यावर प्लेट लावण्याचे काम ऑक्टोबर महिन्यातच सुरू करण्याची मागणी केली होती.
 
या मागणीला पाटबंधारे विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. वेळेत पाणी अडवण्याची व्यवस्था झाल्यामुळे नदीतील उपलब्ध पाणीसाठा टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे. दरम्यान, आंबा नदीतील पाणी अधिक काळ उपलब्ध राहावे आणि शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी त्याचा उपयोग व्हावा, यासाठी नगरपंचायतीने जॅकवेलजवळ आणि पेठे परिसरात दोन लघु बंधारे उभारले आहेत. या दोन्ही बंधार्‍यांची उभारणी पूर्ण झाली आहे.
 
नदीतील पाणी अडवून त्याचा साठा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था महत्त्वाची ठरणार आहे. केटी बंधार्‍यावर प्लेट लावण्याचे काम आणि नदीवरील लघु बंधार्‍यांची उभारणी या माध्यमांतून पाणीसाठा वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी संभाव्य परिस्थितीचा विचार करून आधीपासूनच नियोजन करण्यावर नगरपंचायतीने भर दिला आहे.
 
पाणी साठवणुकीसोबतच उपलब्ध पाण्याचा अपव्यय टाळणेही तितकेच महत्त्वाचे असल्याने पाली नगरपंचायतीने पाणीपुरवठा करणार्‍या पाईपलाईनमधील गळती रोखण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ज्या ठिकाणी पाइपलाईन खराब झाल्या होत्या किंवा पाण्याची गळती होत होती, त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी करून उपलब्ध पाणी अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे. पाणीसाठा वाढवणे, नदीतील पाणी अडवणे आणि वितरण व्यवस्थेतील गळती रोखणे, अशा विविध उपाययोजनांच्या माध्यमातून शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे.
 
पाली शहरातील नागरिकांना आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी नगरपंचायतीकडून पाणी साठवणूक आणि पुरवठा व्यवस्थेच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. मात्र, पाणीटंचाईचा धोका कमी करण्यासाठी प्रशासनाच्या उपाययोजनांसोबत नागरिकांचे सहकार्यही आवश्यक आहे.
 
पालीकरांनी पाण्याचा वापर जपून करावा, नळ सुरू ठेवून पाणी वाया घालवू नये, घरातील पाण्याची गळती त्वरित दुरुस्त करावी आणि गरजेपुरतेच पाणी वापरावे, असे आवाहन करण्यात येत आहे. नगरपंचायतीचे पूर्वनियोजन आणि नागरिकांचा सहभाग यांच्या माध्यमातून उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर करणे ही काळाची गरज बनली आहे.