कर्जत । टोरेंट वीज प्रकल्पाच्या उद्घाटनाला पंतप्रधानांनी येऊ नये ! प्रकल्प रद्द करण्याची कर्जतकरांची कळकळीची विनंती

अन्यथा काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवणार

By Raigad Times    19-Oct-2026
Total Views |
 karjat
 
कर्जत । कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरेंट वीज प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 नोव्हेंबर रोजी कर्जतला येणार असल्याचे समजताच नागरिकांनी या दौर्‍याला विरोध दर्शवला आहे. पंतप्रधानांनी उद्घाटनाला येऊ नये आणि हा प्रकल्प रद्द करावा, अशी विनंती कर्जतकरांनी केली आहे.
 
तरीही पंतप्रधान आले, तर काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे. कर्जत तालुक्यात टोरेंट वीज प्रकल्प तसेच पोशीर, शिलार, कोंढाणे धरण होणार आहे. या सर्व प्रकल्पांमुळे कर्जतचे पर्यावरण धोक्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी, आदिवासी उध्वस्त होणार आहेत. या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी कर्जत बचाव समितीच्या वतीने श्री शनी मंदिर येथील रवी किरण सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.
 
या बैठकीला समितीचे समन्वयक अ‍ॅड. कैलास मोरे, प्रवीण गांगल, प्रशांत उगले, राजेश लाड, सतीश मुसळे, अरुण देशमुख आदी उपस्थित होते. बैठकीत अ‍ॅड. कैलास मोरे यांनी प्रस्तावित प्रकल्पांमुळे कर्जत तालुक्यातील जनजीवनावर होणार्‍या संभाव्य परिणामांची सविस्तर माहिती दिली. प्रवीण गांगल यांनी, “विविध प्रकल्पांमुळे कर्जतचा विकास होईल, असा समज असला, तरी प्रत्यक्षात कर्जत भकास होण्याची भीती आहे,” असे मत व्यक्त केले.
 
रमेश कदम यांनी आक्रमक भूमिका मांडताना, “पंतप्रधान आले, तर सर्वप्रथम मी निषेध नोंदवीन. प्रसंगी त्यांच्यासमोर आत्मदहनही करीन. ही लढाई जिंकली, तर आपण कधीही हरणार नाही,” असे सांगितले. रामदास घरत यांनी सर्वांनी एकजुटीने हा लढा यशस्वी करण्याचे आवाहन केले. तर अरुण देशमुख यांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन या संघर्षात सहभागी होण्याचे आवाहन करण्याची सूचना केली. नॅन्सी गायकवाड यांनी, “सरकार सर्वसामान्यांसाठी आहे की नाही, असा प्रश्न पडतो.
 
सरकार श्रीमंतांसाठीच काम करत असल्याचे दिसते,” अशी टीका केली. यावेळी सतीश पाटील, सचिन गायकवाड, तानाजी चौधरी, शिवाजी श्रीखंडे, राजेश लाड आणि तानाजी तुरडे यांनीही आपली मते मांडत विविध सूचना केल्या. या बैठकीला विजय बेडेकर, शंकर थोरवे, डॉ. प्रशांत सदावर्ते, चंद्रकांत मांडे, लोकेश यादव, धर्में द्र मोरे, अ‍ॅड. रवींद्र गायकवाड, अतुल पवार, तानाजी ओंबळे यांच्यासह तालुक्यातील अनेक प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.