पोलादपूरात जीपमधून बंदूक, 10 काडतूसे जप्त ; सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांची कारवाई

By Raigad Times    19-Oct-2026
Total Views |
 poladpur
 
पोलादपूर । पोलादपूर शहरात मध्यरात्री संशयास्पदरीत्या फिरणार्‍या पिकअप जीपमधून पोलिसांनी एक बंदूक आणि 10 जिवंत छरा काडतुसे जप्त केली. स्थानिक सामाजिक कार्यकर्तीने दाखवलेल्या सतर्कतेमुळे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा 1959 च्या कलम 3(1) व 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
शहरातील दांडियागरबा कार्यक्रम संपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पोलादपूर एसटी स्थानकासमोरील आकृती हॉटेलजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या पिकअप जीपमधील तिघांची हालचाल एका स्थानिक सामाजिक कार्यकर्तीला संशयास्पद वाटली. तिने रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी एमएच 46-डीसी 1451क्रमांकाच्या जीपमधील तिघांना हटकून वाहनाची झडती घेतली.
 
या तपासणीत लाकडी बट असलेली सिंगल बोअर बंदूक आढळून आली. या बंदुकीची किंमत सुमारे 30 हजार रुपये असून, ‘शक्तिमान एक्सप्रेस’ असे इंग्रजी अक्षरांत लिहिलेल्या हिरव्या रंगाच्या डब्यातील 10 जिवंत छरा काडतुसांची किंमत सुमारे 1,500 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले. बंदूक बाळगण्याचा किंवा वापरण्याचा आवश्यक परवाना नसल्याचे आढळल्याने पोलिसांनी शस्त्र आणि काडतुसे जप्त केली.
 
सहायक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश मुंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. जीपमधील व्यक्तींकडे विनापरवाना शस्त्र आढळून आले असले, तरी ते रात्री शस्त्र घेऊन कोणत्या उद्देशाने फिरत होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सामाजिक कार्यकर्तीने वेळीच पोलिसांना माहिती दिल्यामुळे ही कारवाई शक्य झाली. तिच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी तिचे नाव गोपनीय ठेवले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
 
या प्रकरणी प्रथमेश उद्धव निकम (वय 30) आणि अजित अशोक राजपुरे (वय 36), दोघेही रा. माणिक प्रभू सुतार कॉलनी, संभाजीनगर, सातारा, यांच्यासह जीपमधील तिघांविरुद्ध पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 114/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार सुतार यांनी गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.