रायगड | खरीप हंगाम २०२६ मध्ये रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात ‘ट्रिगर-१’ (प्रथम कळ) आणि ‘ट्रिगर- २’नुसार दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा आणि संभाव्य टंचाई टाळता यावी, यासाठी रायगड जिल्ह्याच्या महसुली हद्दीतून इतर जिल्ह्यांत तसेच राज्याबाहेर सर्व प्रकारच्या ओल्या व सुक्या चार्याची वाहतूक आणि विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये हे आदेश जारी केले आहेत. जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, रायगड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा मोठ्या प्रमाणावर इतर जिल्ह्यांत विक्रीसाठी पाठविला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर चार्याची कमतरता निर्माण होऊन पशुधनाच्या संगोपनावर परिणाम होऊ शकतो.
तसेच चार्याच्या उपलब्धतेवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे. या आदेशानुसार, रायगड जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत किंवा राज्याबाहेर कडबा, कुट्टी, पेंढा यांसह सर्व प्रकारच्या ओल्या व सुक्या चार्याची वाहतूक आणि विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
मात्र, शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत मंजुरी मिळालेल्या चारा वाहतुकीला या आदेशातून सूट देण्यात आली आहे. हा आदेश जारी केल्याच्या दिनांकापासून पुढील आदेश होईपर्यंत लागू राहणार असून, त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील पशुधनासाठी चार्याची उपलब्धता कायम राखणे आणि संभाव्य चारा टंचाईवर नियंत्रण ठेवणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.