अलिबाग । महाड तालुक्यातील नांदगाव खुर्द येथील दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखण्यात महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला यश आले आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांनी नांदगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी, महाड शहर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक व कनिष्ठ संरक्षण अधिकारी यांच्या संयुक्त पथकाच्या होणारे 2 बालविवाह थांबवले.
बालविवाह रोखण्यासाठी कायदा केला असला तरी, पुरोगामी महाराष्ट्रात बालविवाह थांबलेले नाहीत.कायद्यानुसार मुलींसाठी लग्नाचे वय 18 वर्षे तर मुलांचे वय 21 वर्षे असणे अपेक्षित आहे. मात्र 14 ते 18 वयोगटातील मुलींची सर्रास लग्न लाऊन दिली जात आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलींवर कमी वयात मातृत्वाचा भार टाकला जात असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत.
कनिष्ठ संरक्षण अधिकारी यांना बालविवाह बाबत गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी मुलींच्या वयाची खात्री केली असता त्या दोन्ही मुलींचे वय अनुक्रमे 16 वर्षे 8 महिने व 16 वर्षे 1 महिना असल्याचे आढळून आले. त्यामुळे हे विवाह बालविवाह असून तो कायद्याने बेकायदेशीर ठरत होता. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी जाऊन बालविवाह थांबवला. या अल्पवयीन मुलींना जिल्ह्याच्या बालकल्याण समितीसमोर हजर केले जाणार आहे.
आदिवासी समाजातील निरक्षरता, गरिबी आणि स्थलांतरण ही बालविवाह समस्येमागील मूळ कारण आहे. जिल्ह्यातील आदीवासी ऊस तोडणीसाठी, खाणकाम करण्यासाठी तसेच वीटभट्ट्यांवर जातात. या स्थलांतरामुळे मुलांची आबाळ होते. त्यामुळे लहान वयातही मुलामुलींची लग्न लावली जातात.
जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी ग्रामसेवकांना प्रशिक्षण देण्याचे काम आमच्या विभागाने हाती घेतले आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी तसेच ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहोत जर आपल्या गावात बालविवाह होत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन 1098 ला माहिती द्यावी. माहिती देणार्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. - श्रीकांत हावळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, रायगड