नवी मुंबई । उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझे कोणतेही वैयक्तिक वाद नाहीत. मात्र त्यांनी इतरांना हलक्यात घेऊ नये, असा थेट इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला आहे. “मला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार” असे शिंदे नेहमी म्हणतात, पण त्यांनीही इतरांचा सन्मान ठेवावा, असा टोला नाईक यांनी लगावला.
14 गावांचा महापालिकेत समावेश करताना मंत्रालयातून थेट फतवा काढण्यात आला. त्यावेळी स्थानिक आमदार म्हणून मला विश्वासात घेतले गेले नाही. मी याआधी तीन वेळा पालकमंत्री राहिलो आहे. किमान एक शब्दाने तरी विचारायला हवे होते, असे नाईक म्हणाले. पारसिक डोंगर परिसर महापालिकेत समाविष्ट करण्याचा ठराव मीच मांडायला लावला होता. त्या भागातून भुयारी मार्ग प्रस्तावित होता.
तेव्हा त्याचा खर्च 500 कोटी होता, मात्र आज तो तब्बल 6 हजार कोटींवर गेला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. नवी मुंबई महापालिकेच्या युतीबाबत बोलताना नाईक म्हणाले की, पक्षाच्या नेतृत्वामुळे आम्ही स्थानिक नेत्यांना युतीची चर्चा करण्यास सांगितले होते. मात्र शिंदे सेनेने जागा वाटपात 57 जागांची मागणी केली. म्हणजेच त्यांना नवी मुंबईत ‘मोठा भाऊ’ व्हायचे होते. गेली 30 वर्षे या शहरात आमची सत्ता आहे.
अशा परिस्थितीत आम्ही निम्म्या जागा कशा देऊ शकतो? ऐरोली मतदारसंघात मला 85 हजार मते मिळाली, तर बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे यांचा विजय अवघ्या 300 मतांनी झाला. पराभूत झालेले संदीप नाईकही आमच्याकडे आले आहेत. मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक यांच्या मतांची बेरीज केली तर 85 ते 90 टक्के मते भाजपकडे आहेत. त्यामुळे युती न होण्यास शिंदे सेना कारणीभूत ठरली, असेही नाईक यांनी स्पष्ट केले. इतर पक्षातील नगरसेवक आपल्या पक्षात घेऊन जागांची संख्या वाढवून दाखवण्याचा प्रयत्न होता. त्यांना मोठा भाऊ व्हायचे होते, पण नवी मुंबईतील कार्यकर्ते हे कसे सहन करतील, असा प्रश्न उपस्थित करत नाईक यांनी शिंदे सेनेवर टीका केली.