अलिबाग । खोपोलीच्या नवनिर्वाचित शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचा अटकपूर्व जामीन पनवेल सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
खोपोलीच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश सदाशिव काळोखे (वय सुमारे 45) यांची 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 7 वाजता हत्या करण्यात आली. ते आपल्या मुलींना शाळेत सोडून परत येत असताना, त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
याप्रकरणी पोलिसांनी रविंद्र देवकर, त्याची दोन मुले तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि भरत भगत यांच्यासह अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल केला होता. पोलीस तपासात रविंद्र देवकर यांने 25 लाखांची सुपारी देऊन ही हत्या करवून आणल्याचे पुढे आले आहे. सुपारी घेणार्या दोघांसह आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली असून अन्य संशयितांचा शोध सुरु आहे. सुधाकर घारे आणि भरत भगत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
त्यामुळे या दोघांनीही 1 डिसेंबर रोजी पनवेल सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर मंगळवारी (6 जानेवारी) सुनावणी झाली. अतिरिक्त सरकारी वकिल अॅड.भोपी यांनी सरकार पक्षातर्फे जोरदार बाजू मांडली. काळोखे यांच्या हत्येनंतर रविंद्र देवकर हा भरत भगत यांच्या घरी जाऊन त्यांना भेटला होता. तर सुधाकर घारे यांच्याशीदेखील तो फोनवरुन संपर्कात होता.
त्यामुळे या दोघांच्याही पोलीस कोठडीची गरज असल्याचे सांगत दोघांचेही जामीन अर्ज फेटाळण्यात यावे अशी विनंती अॅड.भोपी यांनी न्यायालयाला केली होती. तर घारे आणि भगत यांना नाहक या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलाने केला होता. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर तसेच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, अतिरिक्त सत्र न्यायाधीश संतोष चव्हाण यांनी सुधाकर घारे आणि भरत भगत या दोघांचेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.
अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्यामुळे सुधाकर घारे व भरत भगत यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असून, पुढील तपासाच्या अनुषंगाने पोलिसांची कारवाई होण्याची शक्यता आहे.