सात दरोडेखोरांना पोलिसांच्या बेड्या! रायगड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

अलिबाग-मापगाव येथील दरोडा प्रकरण

By Raigad Times    06-Jan-2026
Total Views |
alibag
 
अलिबाग । अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील दरोडा प्रकरणी रायगड पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. अटकेनंतर त्यांना अलिबाग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. अवघ्या 24 तासांत पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
 
मापगाव येथे राहणारे कुकूचकू पोल्ट्रीचे मालक दिलीप पाथरे यांच्या घरावर शनिवारी मध्यरात्री दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी घरातील काही लोकांना बंदी बनवून, 20 लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. या घटनेमुळे अलिबागमध्ये खळबळ उडाली होती. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांची झोप उडाली होती.
 
रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेसोबत अलिबाग पोलिसांनी तपासाची चके्र वेगाने फिरवण्यास सुरुवात केली होती. आरोपींकडून अवलंबण्यात येणार्‍या संभाव्य हातखंड्यांचा अभ्यास आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर रायगड पोलिसांचे हात अवघ्या 24 तासांत दरोडेखोरांच्या गचंडीपर्यंत पोहचले. पोलिसांनी सचिन प्रकाश जाधव (वय 34, रा. कावेगाव, भिवंडी), अविनाश वामन पाटील (वय 32, रा. कादईगाव, भिवंडी), शहाबुद्दीन अलिमुद्दीन अन्सारी (वय 20, रा. भिवंडी), सुनिल रोहिदास शिंदे (वय 36, रा.कळंबोली ता.पनवेल), आकाश राजू पाटोळे (वय 21, रा. सिद्धार्थनगर, ठाणे), अभिजीत अनिल पाटोळे (वय 24, रा. ठाणे), अर्जुन कमलाकर मिसाळ (वय 25, रा. म्हाडा कॉलनी, वसंत विहार, ठाणे) या सातजणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी वापरलेले दोन टेम्पोदेखील ताब्यात घेण्यात आले आहेत.
 
अटकेतील एकजण पनवेल येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे यातील चारजण पंचविशीच्या आतील आहेत. अटकेनंतर पोलिसांनी सोमवारी अलिबाग येथील न्यायालयात हजर केले असता, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस चौकशीत या सर्वांनी दरोड्याची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याशिवाय आणखी काहीजण या दरोड्यात असण्याची शक्यता असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

alibag
 
दरोड्यातील सात दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. लवकरच या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक होईल. त्यांच्याकडून मुद्देमाल परत घेण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. - आंचल दलाल, पोलीस अधीक्षक, रायगड