श्रीवर्धन । श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला समुद्र किनारी भलेमोठे ग्रीन सी टर्टल चिखलात अडकून पडल्याचे आढळून आले. रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर प्रथमच अशाप्रकारचा नर ग्रीन सी कासव आढळला असल्याची माहिती कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये यांनी दिली.
किनार्यावर चिखलात एक भले मोठे कासव अडकून पडल्याचे येथे काम करणारे कर्मचारी आकाश सुरेश पाडलेकर (रा. वेळास) यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही बाब तातडीने कांदळवन विभागाच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर कार्यरत वनरक्षक, कासव तज्ञ व ‘कासव मित्र’ यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, ते ग्रीन सी टर्टल या प्रजातीचे नर कासव असल्याचे स्पष्ट झाले.
रायगड जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात आढळणार्या पाच समुद्री कासव प्रजातींपैकी ही एक प्रजाती असून, बागमांडला, श्रीवर्धन येथे प्रथमच नर ‘ग्रीन सी’ कासव किनार्यावर वाहून आल्याची माहिती कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये यांनी दिली. अंदाजे 200 किलो वजनाचे हे ग्रीन सी कासव असून त्याची डोक्यापासून शेपटीपर्यंत लांबी सुमारे 190 सेंटीमीटर (6 फूट 3 इंच), पाठीची लांबी 65 सेंटीमीटर (2.11 फूट), रुंदी 62.5 सेंटीमीटर (2 फूट) आणि शेपटी 36 सेंटीमीटर असल्याची नोंद वन कर्मचार्यांनी केली आहे.
ओहोटीमुळे हे कासव किनार्यावर वाहून आले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वन कर्मचार्यांनी कासवाची तपासणी केली असता, त्याच्या शरीरावर कोणतीही दुखापत आढळून आली नाही. त्यानंतर मारळ येथील जयंत कानडे, संकेत मयेकर तसेच हरिहरेश्वर येथील संतोष मयेकर व सुबोध खोपटकर (कासव मित्र), कांदळवन विभागाचे अधिनस्त वनरक्षक तुषार बाप्पासाहेब भटे व ऋषिकेश विश्वास लव्हाटे, कासव तज्ञ मोहन उपाध्ये, स्थानिक ग्रामस्थ आणि फेरीबोटीवर काम करणार्या युवकांच्या सहकार्याने कासवाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.
यापूर्वी रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी किंवा खाड्यांमध्ये ग्रीन सी टर्टल प्रजातीच्या माद्या आढळल्या होत्या; मात्र नर ग्रीन सी टर्टल आढळण्याची ही रायगड जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. अशाप्रकारे समुद्री कासव आढळल्यास त्वरित कांदळवन विभागास माहिती द्यावी, असे आवाहन विभागीय वन अधिकारी, कांदळवन विभाग, दक्षिण कोकण कांचन पवार यांनी केले आहे.