
अलिबाग । राष्ट्रवादीशिवाय रायगडजिल्हा परिषदेची सत्ता स्थापन होणार नाही, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचा कसा होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवली. नागोठणे येथील शिवसेनेचे नेते किशोर जैन व त्यांच्या समर्थकांनी सोमवारी (5 जानेवारी) राष्ट्रवादीत प्रवेश केला.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषदेनंतर पुढील साडेतीन वर्षे कोणत्याही मोठ्या निवडणुका नाहीत. त्यामुळे या काळात विकासकामांवर पूर्ण लक्ष केंद्रीत करता येईल, असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे तीन नगराध्यक्ष आणि 71 सदस्य निवडून आले आहेत. अत्यंत चांगला प्रयत्न त्याठिकाणी झाला. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
या निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन अजित पवार यांनी केले. केंद्र व राज्य सरकारच्या निधीचा योग्य वापर करुन रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात येतील. मोठ्या गुंतवणुकीसाठी उद्योगपतींशी चर्चा केली जाईल, असे स्पष्ट करतानाच, राज्यासाठी रायगड जिल्हा महत्त्वाचा असल्याने विकास निधी देण्यात कोणतीही कमतरता राहणार नाही, असा शब्दही यावेळी त्यांनी दिला.
यावेळी खा. सुनील तटकरे यांनी यावेळी खा.सुनील तटकरे यांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्याप्रमाणेच रायगड जिल्ह्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. हे यश म्हणजे रायगड जिल्ह्यातील जनतेचा राष्ट्रवादी विचारसरणीवर असलेला ठाम विश्वास असल्याचे प्रतिक असल्याचे म्हटले आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केला.
तर किशोर जैन यांनी येणार्या काळात रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष अधिक भक्कमहोईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पुढील काळात रिलायन्सकडून जामनगर येथे ज्या पद्धतीने विकास साधला गेला, त्याच धर्तीवर नागोठणचा विकास करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करुन असे म्हटले आहे. याप्रसंगी माजी आमदार अनिकेत तटकरे, यांच्यासह कर्जत, रोहा, मुरुड-जंजिरा, महाड, श्रीवर्धन, पेण, खोपोली व माथेरान येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.