खोपोली । “मला सकाळी शाळेत सोडायला आले होते. ‘दुपारी घ्यायला येतो’ असे सांगून गेले पण माझे पप्पा परत आलेच नाहीत. माझ्या पप्पांचा गुन्हा काय होता? त्यांची हत्या का केली?” असा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश मंगेश काळोखे यांच्या मुली वैष्णवी व आर्या यांनी केला.
त्यांच्या वेदनादायी शब्दांनी उपस्थितांचे डोळे पाणावले. खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे हे 26 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे आपल्या मुलींना शाळेत सोडण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. शाळेतून परतत असताना विहारी पुलाजवळ मारेकर्यांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर थेट प्राणघातक हल्ला केला.
धारदार शस्त्रांनी वार करत मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला. “आमचे पप्पा आमच्या गावचे पालनपोषणकर्ते होते. हे आरोपी पुन्हा बाहेर आले, तर गावात पुन्हा दहशत माजवतील. त्यामुळे आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी किंवा त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी,” अशी मागणी लहान मुलगी आर्या हिने केली.
निवडणुकीपूर्वी आम्हा दोघींना ठार मारण्याची आणि निवडणुकीनंतर ‘तुला दाखवतो’ अशी धमकी माझ्या पप्पांना देण्यात आली होती. या धमक्या देणार्यांना अद्याप अटक झालेली नाही, याची खंत वाटते. सर्व दोषींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे,” अशी भावना मोठी मुलगी वैष्णवी हिने माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.