म्हसळा । महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त ‘पोलीस रायझिंग डे’ म्हसळा येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यासोबतच अत्याधुनिक शस्त्रांचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्यात आले.
3 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हसळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिवसाचे महत्त्व विशद केले. तसेच पोलीस खात्यातील विविध पदे, त्यांची कर्तव्ये आणि ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलीस ब्रीदवाक्याचा अर्थ विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितला.
विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, या दृष्टीने सहायक पोलीस निरीक्षक पारखे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (णझडउ) व महाराष्ट्र लोकसेवा आयोग (चझडउ) यांच्या स्पर्धा परीक्षांची माहिती देत प्रशासकीय सेवेत करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पोलीस दलातील शस्त्रांचे प्रदर्शन होते. यावेळी विद्यार्थ्यांना एस.एल.आर., पिस्तूल, कार्बाईन, अॅक्शन पंप मशीनगन यांसह विविध प्रकारची शस्त्रे जवळून पाहण्याची संधी देण्यात आली. शस्त्रांचे प्रत्यक्ष दर्शन घेताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर कुतूहल व उत्साह स्पष्टपणे दिसून येत होता.