उरण । उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड शहरातील विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याने येथील रहिवाशांना तब्बल दोन दिवस अंधारात चाचपडत रहावे लागले. महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
उरण तालुक्यात वाढते औद्योगिकीकरण व नागरीकरण लक्षात घेता सिडको प्रशासनाने द्रोणागिरी नोडमधील सेक्टर 45 ते 54 तसेच इतर भागांत विकसित शहर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या परिसरात झपाट्याने वसाहती वाढत असल्या तरी, मूलभूत नागरी सुविधा पुरवण्यात सिडको प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. उघडी गटारे, अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त रस्ते, तसेच वाढते डासांचे साम्राज्य यांचा सामना येथील नागरिकांना सातत्याने करावा लागत आहे.
या समस्यांमध्ये भर घालत शुक्रवारी (दि.2 जानेवारी) ते शनिवारी (दि. 3 जानेवारी) या दोन दिवसांत द्रोणागिरी नोड परिसरातील विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. त्यामुळे घरगुती कामे, पिण्याच्या पाण्याची अडचण, तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा विपरीत परिणाम झाला. नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीला सामोरे जावे लागले.
सिडको आणि महावितरण विभागाच्या अशा निष्काळजी व ढिसाळ कारभारामुळे रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, सध्या विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करण्यात आल्याची माहिती महावितरण विभागाकडून देण्यात आली असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असेही सांगण्यात आले आहे.