‘नोटा’ अधिकाराची अंमलबजावणी करा , अ‍ॅड.संतोष खांडेकर यांचे निवडणूक अधिकार्‍यांना निवेदन

By Raigad Times    05-Jan-2026
Total Views |
 Panvel
 
पनवेल । पनवेलसह राज्यातील महापालिका निवडणुकीत अनेक जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे. मात्र लोकशाहीची मूलभूत तत्त्व जोपासण्यासाठी तसेच ‘नोटा’ अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही जागा बिनविरोध करु नये, अशी मागणी पनवेल पत्रकार मित्र असोसिएशन व अ‍ॅड.संतोष खांडेकर यांनी केली.
 
निवडणूक प्रक्रियेत मतदारांना उमेदवारांच्या विरोधात आपली असहमती नोंदविण्याचा घटनात्मक अधिकार आहे. एखाद्या मतदाराला निवडणूक लढविणार्‍याउमेदवारांपैकी एकही उमेदवार योग्य वाटत नसेल, तर तो नोटा हा पर्याय निवडू शकतो. नोटा हा मतदारांच्या नकारात्मक कौलाचे प्रभावी माध्यम असून त्यातून लोकशाही अधिक सक्षम होते.
 
अ‍ॅड.संतोष खांडेकर यांनी यासंदर्भातील निवेदन पनवेल पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष केवळ महाडीक, कार्याध्यक्ष नितीन जोशी तसेच अ‍ॅड. संतोष खांडेकर यांनी पनवेलचे प्रांत अधिकारी तथा निवडणूक अधिकारी पवन चांडक यांना दिले आहे. एखाद्या मतदाराला बिनविरोध घोषित उमेदवार मान्य नसेल, तर संविधानाने त्याला नोटा हा पर्याय दिलेला आहे. त्यामुळे ‘नोटा विरुद्ध बिनविरोध उमेदवार’ अशी निवडणूक प्रक्रिया राबवून मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी द्यावी, तसे न केल्यास न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात असल्याची माहिती अ‍ॅड.संतोष खांडेकर यांनी दिली.