खोपोली । खोपोली शहरातील शिळफाटा, डी.पी. रोडवरील आशियाना इन्फिनिटी सोसायटी परिसरात असलेल्या वीज ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याची कॉईल व ऑईल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या चोरीत सुमारे 52 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले असून याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना 3 जानेवारी रोजी पहाटे सुमारे 2.30 वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याची कॉईल व ऑईल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या परवानगीशिवाय, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या हेतूने चोरी करून नेल्याची तक्रार करण्यात आली आहे.
खालापूर तालुक्यात यापूर्वीही ट्रान्सफॉर्मर चोरीच्या अनेक घटना घडलेल्या असून, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 3/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.