अलिबाग । कुक्कुट खाद्य निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कुकूचकू कंपनीचे मालक दिलीप पाथरे यांच्या बंगल्यात शनिवारी (3 जानेवारी) मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी थरकाप उडवणारा दरोडा टाकला. हत्यारांचा धाक दाखवत दरोडेखोरांनी घरातील चिमुकला आयान पाथरे याला ताब्यात घेत कुटुंबियांच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याची धमकी दिली.
या दरोड्यात सुमारे 20 लाख रुपयांचा ऐवज लुटून दरोडेखोरांनी पलायन केले. मुशेत गावाच्या हद्दीत दिलीप पाथरे यांचा बंगला असून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास तब्बल नऊ दरोडेखोरांनी बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या वॉल कंपाउंडवरील तारांचे जाळे तोडून आवारात प्रवेश केला. त्यानंतर मागील बाजूची स्लायडिंग विंडो उघडून लोखंडी ग्रीलला लावलेले कुलूप व कडी- कोयंडा हत्यारांच्या साहाय्याने तोडून ते घरात शिरले.
घरातील खोल्यांची झडती घेत असताना दरोडेखोरांपैकी काहींनी लहान आयान पाथरे याला शस्त्राचा धाक दाखवून घराबाहेरील आवारात नेले. त्याठिकाणी त्याच्यावर हत्यार उगारून त्यांनी घरातील साथीदारांशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. त्यानंतर घरातील दरोडेखोरांनी मुख्य दरवाजाला आतून कडी लावून दरवाजामागे कटावणी अडकवली आणि कुणाल पाथरे व त्यांची पत्नी विनिता पाथरे ज्या खोलीत झोपले होते तेथे प्रवेश करून त्यांना शस्त्रांच्या दहशतीखाली ठेवले.
कुणाल पाथरे यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर पेट्रोल ओतून जाळण्याची धमकी दिली. हळूहळू घरातील सर्व सदस्यांना शस्त्राचा धाक दाखवून उठवण्यात आले. दिलीप पाथरे आणि त्यांची पत्नी माधवी पाथरे यांनीही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता झटापटीत माधवी पाथरे यांच्या हाताला चाकू लागून जखम झाली, तर दिलीप पाथरे यांनाही मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतण्यात आले. “तिजोरी कुठे आहे, दागिने आणि रोख रक्कम तातडीने द्या, अन्यथा घराबाहेर आमच्या ताब्यात असलेल्या आयानला मारून टाकू,” अशी धमकी देत दरोडेखोरांनी कुटुंबीयांना घाबरवले. हा संपूर्ण प्रकार पाथरे यांची नात ओवी पाथरे पाहत होती.
दरोडेखोरांनी घरातील महिलांना इजा केली जाणार नाही, असे सांगून दहशत कायम ठेवली. आपला मुलगा दरोडेखोरांच्या ताब्यात असल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखत कुणाल पाथरे यांनी वडील दिलीप पाथरे यांच्या सल्ल्याने घरातील दागिने व रोख रक्कम असा सुमारे 20 लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांच्या हवाली केला. मात्र रक्कम कमी असल्याचे सांगत दरोडेखोरांनी घराची संपूर्ण माहिती असल्याच्या अविर्भावात तळघर दाखवण्यास भाग पाडले. घरातील छायाचित्रांची तोडफोड करून त्यांनी सर्वत्र शोध घेतला; मात्र अधिक काही हाती लागले नाही.
बंगल्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दरोडेखोर चारचाकी वाहनाने आल्याचे तसेच मार्ग दाखवण्यासाठी एक दुचाकी वापरण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरोडेखोर पसार झाल्यानंतर दहशतीत असलेल्या पाथरे कुटुंबीयांनी अलिबाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पेट्रोलिंगवरील पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर तपास पथक व पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनीही घटनास्थळी भेट दिली.
जिल्हा मुख्यालयाजवळच ही घटना घडल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. फॉरेन्सिक पथकाने उशिरापर्यंत तपास केला असून दरवाजामागे अडकवलेली कटावणी जप्त करण्यात आली आहे. या कटावणीवर असलेल्या पांढर्या कागदावर इंग्रजीत “डीएलआर” असे शब्द लिहिलेले आढळून आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमधील वाहन क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे.