पर्यटकांच्या बसला अपघात; २७ प्रवासी गंभीर, २३ जखमी

By Raigad Times    04-Jan-2026
Total Views |
 mangoA
 
माणगाव | ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावाच्या हद्दीतील अतिशय अवघड आणि अपघातप्रवण वळणावर शुक्रवारी (२ जानेवारी) दुपारी साडेअकराच्या सुमारास पर्यटकांच्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील एकूण ५० प्रवाशांपैकी २७ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, उर्वरित २३ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
 
जखमींमध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. पुणे येथून कोकणात पर्यटनासाठी निघालेल्या श्री. दत्तकृपा ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीची टाटा कंपनीची बस (क्रमांक एमएच १४ एमटी ९३९४) पुणे भोसरी येथून माणगावमार्गे कोकणाकडे जात असताना ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावाजवळील तीव्र वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या डोंगराच्या कठड्याला जोरात धडकली.
 
या बसमधून शिव महिंद्रा कंपनीचे कर्मचारी पर्यटनासाठी कोकणात निघाले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, तसेच पुणेमाणगाव मार्गावरून प्रवास करणार्‍या वाहनचालकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या.
 
अपघातामुळे पुणेमाणगाव मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या वाहतूक शाखेचे पोलीस व माणगाव पोलिसांच्या मदतीने काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली. जखमी प्रवाशांना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना माणगाव येथील रुग्णवाहिका, नजीकच्या पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीच्या रुग्णवाहिका तसेच खाजगी वाहनांद्वारे रुग्णालयात हलविण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
जखमींची नावे | तृप्ती कोळणे (२७), हर्षन एव्हल (२४), नुमान अत्तार (२३), समीर साळुंखे (३८), सुजल घोरपडे (२१), तोहिद शेख (२५), स्नेहल वर्मा (२१), आफरीन इमामदार (२५), मालकिनी लोटे (२९), खुशबू जिसान (३४), श्वेता उघाडे (२२), अंजली गडकर (३१), वर्षा मार्लर (२७), प्रीती मोरे (२३), सारिका मुजेवार (४३), साक्षी पाटील (२४), अंजली डायव्ह (२६), वैभव सांबुचे (२६), कृष्णा भोसले (३०), तृप्ती चव्हाण (३७), पाटील महादेव रेही (३१), नवीन वाळुज (२८), विकास कांबळे (३१), आसिफ शिगलगाकर (२९), शुभम साधू (२४), गणेश देशमुख (२८), अभिषेक वहार (२६), प्रवीण विठेकर (५३), प्रतीक्षा टिके (२७), संदेश बहामर (३७), सृष्टी कदम (२४), वर्षा नंदरगो (२७), सुनफर खलिफ (३३), सुमन अत्तार (२३), वैष्णवी मोरे (४८), आकाश कोवळे (२८), वैष्णवी काटकर (४८), अमर चलवाडी (२५), आकाश नारायण (२८), प्राची चन्ने (२८), प्राजक्ता मोरे (२०), प्रसाद भालेराव (२०), प्रशांत बांगर (४५), जितेश चांदनीपुरे (३५), कुणाल बडे (३४), प्रिया सुतला (३५), सागर कापडे (२९), प्रदीप लाडे (४३), धनंजय यकासरे (२९), सचिन बोधे (३६).