अलिबाग ।आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली असून, अलिबाग तालुक्यातील आवास जिल्हा परिषद गटातून दिलीप भोईर ऊर्फ छोटम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात आढावा बैठका सुरू आहेत. या बैठकीत संघटनात्मक मजबुती, बूथनिहाय नियोजन तसेच आगामी निवडणुकांसाठीची रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शुक्रवारी (दि. २ जानेवारी) झिराड येथे आवास जिल्हा परिषद मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर यांच्या नावावर एकमताने निर्णय घेण्यात आला. त्यांच्या नावावर एकमत झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी, पक्षाचे नेते दिलीप भोईर, दीपकजी रानवडे, नेत्या मानसी दळवी यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. तसेच महिला तालुका संघटक भाग्यश्री पाटील, झिराडच्या माजी सरपंच दर्शना भोईर यांच्यासह आवास व कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघातील अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.