अलिबाग | ‘दहा मिनिटांत घरपोच डिलिव्हरी किंवा झटपट सामान पोहचवण्याचा दावा करणार्या कंपन्यांना पनवेल आरटीओने बे्रक लगावला आहे. झेप्टो, ब्लिंकीट, स्विगी, झोमॅटो, इन्स्टामार्ट, बिग बास्केटसह दहा कंपन्यांना नोटीसा बजावल्या आहेत. झटपटच्या नादात, डिलिव्हरी करणारे आणि नागरिकांचा दोघांचेही प्रवास धोक्यात येत असल्याचे हा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात ‘दहा मिनिटांत घरपोच डिलिव्हरी’ चा मुददा उपस्थित झाला होता. झटपट डिलिव्हरीच्या नावाखाली संबंधीत कंपन्या, डिलिव्हरी बॉय तसेच नागरिकांचेही जीव धोक्यात घातल असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) अतिजलद डिलिव्हरी सेवा देणार्या कंपन्यांना कडक ताकीद देत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
व्यवसाय करा, मात्र डिलिव्हरी कर्मचार्यांचा आणि सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात घालू नका, असा स्पष्ट इशारा आरटीओने दिला आहे. पनवेल आरटीओने झेप्टो, ब्लिंकीट, स्विगी, झोमॅटो, इन्स्टामार्ट आणि बिग बास्केट या प्रमुख कंपन्यांना दोन दिवसांपूर्वी लेखी नोटीस बजावली आहे. ‘१० मिनिटांत डिलिव्हरी’ या संकल्पनेखाली डिलिव्हरी वाहनचालकांकडून वेगमर्यादा ओलांडली जात असून, वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
मोटार वाहन अधिनियम नुसार कोणत्याही व्यक्तीस घाईघाईने, असुरक्षित किंवा बेकायदेशीर पद्धतीने वाहन चालविण्यास प्रवृत्त करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांनी तात्काळ आपल्या डिलिव्हरी धोरणांचा फेरविचार करावा, असे आरटीओने स्पष्ट केले आहे. नोटीसमध्ये कंपन्यांना तीन महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
डिलिव्हरी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत लेखी आदेश देणे, ‘१० मिनिटांत डिलिव्हरी’सारखी वेगाला प्रोत्साहन देणारी जाहिरात व कार्यपद्धती तात्काळ बंद करणे, तसेच प्रत्येक चालकाकडे वैध वाहनचालक परवाना, कागदपत्रे, हेल्मेट व आवश्यक सुरक्षा साधने असणे सक्तीचे करणे, अशा सूचनांचा त्यात समावेश आहे. या सूचनांचे पालन न झाल्यास संबंधित आस्थापनारविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही आरटीओने दिला आहे.